बांधबंदिस्ती फुटली, मुले चिखलात रुतली; दोघे जागीच ठार

दोघांना बाहेर काढण्यात यश

| उरण| वार्ताहर |

उरण तालुक्यातील वेश्वी आदिवासीवाडीतील मुले दिघोडे-धुतूम खाडी किनाऱ्यावर मच्छी पकडण्यासाठी गेली असता, किनाऱ्यावरील बांधबंदिस्ती फुटल्याने चिखलात चार मुले रुतून गेल्याची घटना सोमवारी (दि.26) सायंकाळी ठीक पाचच्या सुमारास घडली आहे. यात दोन मुले दगावली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासीवाडीतील मुले ही नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी दिघोडे-धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनाऱ्यावर सोमवारी सायंकाळी गेली होती. मात्र, खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्ती फुटल्याने चिखलात आदिवासी मुले रुतली गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात दोन मुले दगावल्याची माहिती मिळत असून, उरण पोलिसांनी तसेच वेश्वी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील तांबोळी, धुतूम ग्रामपंचायतीचे सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेऊन आदिवासी मुलांचे जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. दोघांना तात्काळ उरणच्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी अंधार पडल्याने शोधकार्यांत अडचणी निर्माण झाल्या. रात्री उशिरापर्यंत दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्याचे कार्य सुरु राहणार असून याबाबत परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version