बंधार्‍याचे काम निकृष्ट दर्जाचे

स्थानिक ग्रामस्थांनी केली चौकशीची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील धार नदीवर शासनाने लाखो रुपये खर्चून कोल्हापूर टाईप बंधारा बांधला जात आहे. बंधार्‍याचे बांधकाम करताना अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष केल्याने खराब काम केले असून, नित्कृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे पहिल्याच पावसाळ्यात बंधारा वाहून जाण्याची शक्यता आहे, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

शासनाच्या जलसंधारण विभागांतर्गत वारे ग्रामपंचायत हद्दीतून वाहणार्‍या धार नदीवर तीन कोल्हापूर टाईप सिमेंट काँक्रिटचे बंधारे बांधण्यात येत आहेत. मात्र, सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बंधार्‍याच्या बांधामध्ये टाकण्यात आलेल्या लोखंडी सळ्या केवळ जमिनीत उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. काँक्रिट मिश्रणामध्ये 40 एमएमची खडी आणि रेती तसेच ग्रीडचा वापर केला जात आहे. याबाबतीत वारे ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाने सदरच्या सुरू असलेल्या बांधकामाची चौकशी करून बांधकाम योग्य दर्जाचे करावे, अशी मागणी केली आहे.
वारे ग्रामपंचायत हद्दीतील धार नदीवर या पूर्वीही सिमेंट केटी बंधारे बांधण्यात आले होते. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अल्पावधीतच बंधारे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. ‘धार’ नदी कोरडी असून, पाण्याचा थेंब नदी पात्रात पहावयास मिळत नाही. कोट्यवधी रुपये खर्च करूनही आजही तळपत्या उन्हात वन्यजीव पाण्यावाचून तडफडत आहेत. मागील काही वर्षांत याच नदी पात्रात पाच ते सहा सिमेंट काँक्रिटचे बंधारे ठराविक अंतरावर बांधण्यात आले होते.

सध्या कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने व कार्यालयापासून बांधकाम साईड दूर असल्याने समस्या निर्माण होत आहेत. तरीही सदरचे वारे येथील सुरू असलेल्या बंधार्‍याच्या कामाची पाहणी करण्यात येईल. कामात काही त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यात येतील.

विलास देशमुख, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, कर्जत

धार नदीवर बांधण्यात येणार्‍या बंधार्‍याच काम नियमाप्रमाणे होताना दिसत नाही.बंधारा साठी वापरण्यात येणार्‍या काँक्रीट मिक्समध्ये केवळ 40 एमएमची खडी आणि ग्रीड वापरत असल्याने बांधकाम कमकुवत होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याची शक्यता आहे. संबधीत विभागाने कामाची पाहणी करून कारवाई करणे आवश्यक आहे.

शशिकांत म्हसे, ग्रामस्थ, वारे


Exit mobile version