करंज्यात अनधिकृत बांधकामांचे साम्राज्य

मच्छिमारांकडून कारवाईची मागणी

। उरण । वार्ताहर ।

शासनाने तालुक्यातील करंजा गावाजवळ अत्याधुनिक मच्छीमार बंदराची उभारणी केली आहे. या बंदरानजीक असलेल्या मेरी टाईम बोर्डच्या जागेवर मोठ्या प्रमाणात कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकामांचे साम्राज्य उभे राहिले आहे. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

उरण तालुक्यातील करंजा गावाजवळच कोट्यवधी रुपये खर्च करून मच्छीमार बांधवांसाठी बंदर उभारण्यात आले आहे. परंतु, त्यासाठी लागणार्‍या इतर सोयीसुविधांकडे शासनाने लक्ष दुर्लक्ष केलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने डिझेल पंप, बर्फाची फॅक्टरी, मच्छिसाठवणूक केंद्र यांचा प्रामुख्याने अभाव जाणवत आहे. तसेच, अरुंद रस्ता व छोटीमोठी दुकाने यासाठी जागाच उपलब्ध नाही. यातच बंदरा जवळच मेरी टाईम बोर्डची जागा असून या जागेवर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अनेकांनी पक्के बांधकाम करून त्यामध्ये बेकायदेशीर व्यवसाय सुरू केले आहेत.

याबाबत उरणमधील पत्रकारांनी मेरी टाईम बोर्डाचे करंजा येथील निरीक्षक अ.ल. शिंदे यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. यावेळी शिंदे यांनी वरिष्ठ कार्यालय व अधिकारी वर्गाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. यावरून अशा अनधिकृत बांधकामाला आर्थिक साटेलोटातून मूक संमती असल्याची चर्चा मच्छीमार बांधवात सुरू आहे. तरी, अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मेरी टाईम बोर्डच्या जागेवर अनधिकृत बांधकामांचे साम्राज्य उभे राहिले आहे. हे खरे असून आपण याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून तसेच लेखी तक्रार करूनदेखील कोणतीच कार्यवाही होत नाही.

– अ.ल. शिंदे, बंदर निरीक्षक करंजा

Exit mobile version