गंभीर गुन्ह्यासाठी धोकायदायक व्यक्ती घोषित करण्याची मागणी; अनेकांचे पोलीस अधीक्षकांकडे साकडे
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या काळात महाडमध्ये प्राणघातक हल्ला झाला. बेकायदेशीररित्या जमाव करून मतदार आणि सामान्य व्यक्तींमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी विकास गोगावले हे गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहेत. त्यामुळे विकास गोगावले यांना गंभीर गुन्ह्यासाठी धोकायदायक व्यक्ती घोषित करण्यात यावे, अशी मागणी महाडमधील सोमनाथ ओझर्डे यांच्यासह अनेकांनी केली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे रोजगार मंत्री भरत गोगावले यांचा विकास अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास गोगावले हे रोजगार मंत्री भरत गोगावले यांचे सूपूत्र आहेत. दोन डिसेंबरला नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत होती. त्यावेळी विकास गोगावले यांनी बेकायदेशीर जमाव करून इतर व्यक्तींवर प्राणघातक हल्ला केला. सुशांत जबरे व इतर मंडळींवर हल्ला झाला. त्यांच्या वाहनांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मतदार आणि सामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण झाली आहे. विकास गोगावले हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांच्याविरोधात महाड शहर, गोरेगाव आदी पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. विकास गोगावले यांच्या हिंसक आणि गुन्हेगारी कृत्यामुळे भागांतील नागरिक आणि मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात भिती आणि मानसिक आघात निर्माण झाला आहे.
गोगावले यांच्याविरोधात चार गुन्हे दाखल आहेत. आगामी जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीत सार्वजनिक सुव्यवस्था बिघडविण्याची, मतदारांना धमकावण्याची आणि लोकशाही प्रक्रिया व सार्वजनिक सुरक्षेला हानी पोहचविण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विकास गोगावले व त्यांच्या साथीदारांना निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत कार्यक्षेत्रातून हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी महाडमधील काही नागरिकांनी केली आहे. याबाबत सोमवारी (दि.29) सुभाष निकम, चंद्रकांत जाधव, सोमनाथ ओझर्डे, दिलीप भागवत आदींनी गृहविभागाचे पोलीस उपअधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. त्यामुळे रोजगार मंत्री भरत गोगावले यांचा विकास अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गृह उपअधीक्षकांकडून दुय्यम वागणूक
महाड येथील हल्ला प्रकरणातील फरार आरोपी विकास गोगावले हे गुन्हेगारी वृत्तीचे आहेत, असा आरोप करीत महाडमधील काही नागरिकांनी सोमवारी पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस अधीक्षक नसल्याने त्यांनी गृह विभागाचे उपअधीक्षक यांचे कार्यालय गाठले. परंतु, त्यांनी भेटीला आलेल्या नागरिकांना ताटकळत बाहेर ठेवले. त्यांच्या या प्रकाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली अरहे. तसेच, त्यांच्याकडून दुय्यम वागणूक देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
महाडच्या उपअधीक्षकांच्या चौकशीची मागणी
महाड येथे झालेल्या हल्ल्यानंतर आरोपी विकास गोगावले हे गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. महाडचे उपअधीक्षक हे पक्षपातीपणे वागत आहेत. ते निष्पक्ष व सक्षम अधिकारी म्हणून काम करीत नाहीत. त्यांच्यावर तडजोड केल्याचा आरोप आहे. त्यांची तातडीने चौकशी आणि बदली करण्यात यावी. तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत तपास करणे आवश्यक आहे, अशी मागणी महाडमधील काही नागरिकांकडून करण्यात आली आहे.
निवडणूकीत गोगावले यानी गोंधळ घातला. हे चुकीचे आहे. गेली अनेक दिवस आरोपी फरार आहे. आगामी निवडणूकीसह इतर कार्यक्रमाच्यावेळी या आरोपीमुळे जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो. त्यांना तडीपार करण्यात यावे, अशी मागणी आहे. पोलीस अधीक्षक नसल्याने गृह विभागाचे उपअधीक्षक यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, निवेदन स्विकारताना त्यांच्यावर दडपण दिसून आले. ते कारवाई करतील असे वाटत नाही. आठ दिवसांत कारवाई केली नाही, तर न्यायालयात जाणार.
-सोमनाथ ओझर्डे,
शिरगांव, सरपंच







