| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात महाविकास आघाडीत नेमक्या किती जागा जिंकणार हे आज सांगता येणार नाही; पण लोकसभा निवडणुकीत आम्हाला 48 पैकी 31 जागा मिळाल्या. महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या. महाराष्ट्रात आजही सत्ताधार्यांविषयी लोकसभेसारखाच मोठा संताप आहे. येथील जनतेला परिवर्तन हवे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास देशातील मोदीयुगाचा अस्त होत असल्याचा संदेश जनतेपर्यंत जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी मोदी युगाच्या अस्ताचे भाकीत वर्तविले. ते पुढे म्हणाले की, बिहारमध्ये विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची पहिली बैठक झाली होती. त्यात नितीशकुमार यांनी महत्त्वाची भूमिका घेतली होती. भाजपविरोधात एक भक्कम पर्याय उभा करण्याची गरज आहे का, यावर त्यांनी भाषण दिले होते. अशांना सोबत घेऊन मोदी आज नरेंद्र मोदी राजशकट हाकत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास देशातील मोदीयुगाचा अस्त होत असल्याचा संदेश देशात जाईल, असे पवार म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी मोदी युगाच्या अस्ताचे भाकीत वर्तविले. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी आज देशाचे सरकार चालवत आहेत, पण त्यांच्यावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मदत घेण्याची वेळ आली आहे. हे दोन्ही नेते एकेकाळी त्यांच्या राजकीय धोरणांवर टीका करत होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर राजकारण करण्याची परंपरा नव्हती, पण सध्या राज्याची सत्ता ज्यांच्या हाती आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर सुरू केला आहे, हा चिंतेचा विषय आहे. लोकसभेला त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. लोकांनी मतदान आपल्या मतानुसारच केले. हा समजूतदारपणा येथील लोकांमध्ये आहे. त्यामुळे जनता महाविकास आघाडीला संधी देईल, असा ठाम विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. त्यांनी समाजात फूट पाडण्यापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. पंतप्रधानपदावर बसलेल्या व्यक्तीला समाजात विद्वेष पसरवण्याची भाषा शोभत नाही. त्यांनी यापासून दूर राहिले पाहिजे.