पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उपेक्षित

पोलादपूर । वार्ताहर ।
पोलादपूर तालुक्याचे ठिकाण असलेल्या कोकणच्या प्रवेशद्वाराचे शहर पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा सध्या धुळीच्या चादरी ओढलेल्या मळलेल्या स्थितीत उपेक्षित अवस्थेत उभा आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सद्यस्थितीत सुरू असलेल्या चौपदरीकरणादरम्यान या पुतळयाचा अडथळा होऊ शकेल इतपत वाहतुकीची कोंडी या परिसरात जाणवत असताना चौपदरीकरणानंतर ठेवणार की हटविणार याबाबतही अनिश्‍चितता दिसून येत आहे.

अलिकडेच पोलादपूर शहरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66चे काम अंडरपास स्वरूपाचे स्पष्टपणे दिसून येऊ लागले असून या अंडरपास राष्ट्रीय महामार्गावरील बाजूचा पूर्वेकडील सर्व्हिसरोड हा छ.शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा सर्व्हिसरोडच्या मधोमध वाहतुकीस अडथळा अशा स्वरूपाचा असल्याचे वारंवार होणार्‍या वाहतुकीच्या कोंडीमुळे जाणवू लागले आहे. अंडरपासमधून महाबळेश्‍वर रस्त्यावर जाण्यासाठी असलेल्या पश्‍चिमेकडील सर्व्हिसरोडवरून पूर्वेकडील सर्व्हिस रोडवर येण्यासाठीच्या छ.शिवाजी महाराजांच्या पुतळयालगतच्या पुलांमुळेदेखील हा पुतळा वाहतुकीच्या रहदारीमध्ये अडथळा असल्याचे जाणवू लागले असताना काही व्यक्तींच्या समुहाने या पुतळयाच्या देखभाल व निर्णयासाठीचा ट्रस्ट स्थापन करण्याच्या कामास वेग धरल्याचे सांगण्यात येत आहे.

सद्यस्थितीत छ.शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा धुळीच्या साम्राज्याखाली खराबस्थितीत दिसून येत आहे. याकडे शिवप्रेमींचे जरी लक्ष जात असले तरी पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून धुतलेला दिसून येत नाही शिवाय या पुतळयाला अनेकठिकाणी अवकाळी पडलेल्या पावसामुळे धुळीवर पाऊस पडून चिखलासारखे धब्बे बसल्याचे दिसून येत आहे. पोलादपूर नगरपंचायत या पुतळयाची देखभाल करीत नाही तसेच काही समाजसेवींच्या संघटनेने यासंदर्भात पुढाकार घेतल्यानंतरही पुरेसे लक्ष न दिल्याने पुतळयाभोवती लावलेल्या शोभिवंत रोपांच्या पानांवरही धुळीचे लोट बसलेले दिसून येत आहेत. छ.शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे भवितव्य काय असेल याबाबत अद्याप कोणीही ठामपणे भाष्य करताना दिसून येत नसले तरी अंडरपास राष्ट्रीय महामार्गासाठी सुरू असलेल्या उत्खननामुळे या पुतळयावर धुळीचे लोट बसून पुतळयाची दूरवस्था होत असलेली शिवप्रेमींना उघडया डोळयांनी पाहावी लागत आहे.

Exit mobile version