खंडणीखोरास पोलिसांनी केले गजाआड

| पनवेल | वार्ताहर |

पळस्पे गावचे सरपंच चंद्रकांत भोईर यांच्यासह पीडब्ल्यूडीच्या एका अधिकाऱ्यांना पैशासाठी धमकावून त्यांच्याकडून खंडणी मागणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढून त्याचा सहा दिवस पाठलाग करून उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेतले.

पनवेल शहर पोलीस ठाणे येथे तक्रारदार प्रशांत दळवी (पीडब्ल्यूडी स्टोअर मॅनेजर) यांनी तक्रार दिली की कोणीतरी अज्ञात इसम हा त्यांचे तसेच पत्नीचे मोबाईल फोनवर फोन करून “ तुम्हाला मारण्याची सुपारी मिळाली असुन सेटलमेंट करण्याकरिता एक लाख रुपये दे नाहीतर तुम्हाला ठार मारून टाकू’’ अशी धमकी दिली आहे. व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्याकडील पीस्टलसारखे अग्निशस्त्र व काडतुसे दाखवून सतत पैशाची मागणी करत असल्याबाबत तक्रार दिल्याने पनवेल शहर पोलीस ठाणे येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्याचप्रमाणे पळस्पे गावचे सरपंच चंद्रकांत भोईर यांनादेखील ते कर्जत जिल्हा रायगड येथे असताना अशाच प्रकारे अज्ञात इसमाने व्हॉट्सअप नंबरवरून त्यांना खंडणी देण्याबाबत मेसेज तसेच अग्निशास्त्राचे फोटो पाठवलेबाबत तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यास करण्यात आली होती.

पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पनवेलचे प्रशांत मोहिते यांनी तात्काळ एक पथक तयार करून गुन्ह्याचा तपास करण्याबाबत आदेशित केल्याने नमूद केले. त्यानुसार वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तांत्रिक तपास केला असता आरोपीचे लोकेशन हे उत्तर प्रदेश येथील बलिया जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पनवेल शहर पोलीस ठाणेकडील एक तपास पथक त्यामध्ये सपोनि प्रकाश पवार, पो.हवा. संदेश म्हात्रे, पो.ना. मिथुन भोसले व गुन्हे प्रकटीकरण पथक पनवेल शहर हे तात्काळ उत्तर प्रदेश येथे रवाना झाले. आरोपीचे लोकेशन सतत बदलत असल्याने एसटीएफ युनिट वाराणसी यांची मदत घेऊन सतत तीन दिवस तांत्रिक तपास करून आरोपी ब्रिजेश लाल बहादुर चौहान (22) यास जिल्हा बलिया येथून दुर्गम भागातून ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे त्याने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल क्रमांक व सिम कार्ड मिळून आले असून, आरोपी त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे. सदरील आरोपी हा स्थानिक पातळीवर जबरी चोरी, लूटमार करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आरोपीत यास वेळीच ताब्यात घेतल्याने भविष्यात घडणारा गंभीर स्वरूपाचा गुन्हा प्रतिबंध करण्यात यश आले आहे.

Exit mobile version