जुन्या बसेस, चालक-वाहकांची कमतरता; लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितेवर तीव्र संताप
| कापोली | प्रतिनिधी |
पर्यटनाच्या दृष्टीने आणि मुंबई-पुण्यातील चाकरमान्यांसाठी महत्त्वाचे केंद्र असलेल्या श्रीवर्धन येथील एसटी आगाराची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागी नवी भरती न झाल्याने चालक-वाहकांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच इतर आगारांतून आणलेल्या भंगार आणि जुन्या बसेस प्रवाशांच्या माथी मारल्या जात आहेत. या गंभीर समस्येकडे स्थानिक खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्यामुळे श्रीवर्धनकरांमधून आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या दरम्यान, मुंबईत किंवा इतर ठिकाणी असलेले चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावाकडे परतत असतात. तसेच, श्रीवर्धनमधील नागरिक देखील इतर ठिकाणी ये-जा करित असतात. अशातच एसटी आगाराची दयनीय अवस्था समोर आली आहे. नुकतेच मंत्री अदिती तटकरे यांनी हिरकणी कक्षाचे उद्घाटन केले. मात्र, त्यांचे श्रीवर्धन आगाराच्या दुरवस्थेकडे लक्ष न गेल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. श्रीवर्धन आगारातून सुटणाऱ्या गाड्या सुसज्ज स्थितीत नाहीत. पुरेश्या बसेससह चालक-वाहक नाहीत, त्याकडेही लक्ष द्यावे. त्याचबरोबर श्रीवर्धन स्थानकातून सुटलेली एसटी बस नियोजित वेळेत त्या ठिकाणी पोहोचेल कीनाही, याची काहीच शाश्वती नसते. त्यामुळे याकडेही लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे श्रीवर्धनकरांकडून बोलले जात आहे.
दरम्यान, या गंभीर परिस्थितीवर श्रीवर्धन स्थानक प्रमुखांना जाब विचारण्यात आला. यावेळी त्यांनी थेट प्रशासकीय अपयश चव्हाट्यावर आणले. ते म्हणाले की, “वरिष्ठ पातळीवरूनच जर वाहन-चालक आणि बसेस दिल्या जात नसतील, तर आम्ही स्थानिक पातळीवर काय करणार? संपूर्ण महाराष्ट्रातच नवीन भरती रखडली आहे, मग गाड्या चालवायच्या कशा?” असा हतबल सवाल स्थानक प्रमुखांनीच केला आहे. यावरून एसटी महामंडळाचा एकूणच सावळागोंधळ समोर आला आहे. स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हतबल ठरल्यामुळे आता थेट परिवहन मंत्र्यांनकडेच साकडे घालण्याची वेळ श्रीवर्धनमधील प्रवाशांवर आली आहे.त्यांनी तातडीने महाराष्ट्र पातळीवर नवीन चालक-वाहक भरती प्रक्रिया राबवून श्रीवर्धन आगारासाठी नवीन बसेस ताबडतोब उपलब्ध करून द्याव्यात, अशी आग्रही मागणी केली आहे.
श्रीवर्धन आगारात इतर ठिकाणच्या आगारातून आणलेल्या जुन्या आणि गळक्या बसेस चालवल्या जात आहेत. पावसाळ्यात आणि सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांना आगाऊ बुकींग करूनही जागा शोधून बसावे लागत आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांची कोंडी होत आहे. कोकणचा सर्वात मोठा सण असलेल्या गौरी-गणपतीसाठी प्रवाशांकडून दोन महिने अगोदरपासून आगाऊ तिकीट बुकिंग केली जाते. मात्र, असे असतानाही हव्या तशा जादा बसेस लावल्या जात नाहीत. त्यामुळे आगार प्रशासन प्रवाशांच्या भावना पायदळी तुडवून या नियोजनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवासी वर्गाकडून केला जात आहे.
अनेक फेऱ्या खोळंबल्या
श्रीवर्धन स्थानकातून बोरीवली, नालासोपारा आणि विठ्ठलवाडी (कल्याण) कडे रवाना होणाऱ्या बसेस वाहन-चालक कमी असल्यामुळे तासन्तास उशिराने धावत असतात. तसेच, रातराणी आणि काही सकाळच्या बसेस देखील चालक-वाहक नसल्याने बंद करण्यात आल्या आहेत. मुंबईसाठी नवीन बसेस, सकाळच्या फेऱ्या आणि रातराणी सुरू करण्याची मागणी पत्रकारांनी देखील केली आहे. मात्र, “पुरेश्या बसेस व वाहक-चालक उपलब्ध नाहीत” हे एकच कारण पुढे करून या फेऱ्या सुरू केल्या जात नाहीत.
आता तर खुद्द स्थानक प्रमुखच हतबल झाले आहेत. जर राज्यामध्ये भरतीच होणार नसेल, तर आमच्या हक्काच्या लालपरीचे काय होणार? आमच्या हक्काच्या बाप्पाच्या सणालाही जर आम्हाला लालपरी मिळणार नसेल, तर थेट परिवह मंत्र्यांसमोर दाद मागण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही.
धनंजय चौलकर,
स्थानिक प्रवासी
आम्ही दोन-दोन महिने आधी तिकीट बुक करूनही आम्हाला वेळेवर बस मिळत नाही. गौरी-गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची ही अडवणूक थांबणार कधी? जास्तीच्या बसेस आणि वाहक-चालक नसल्याचे कारण पुढे करून प्रशासन आमच्या भावनांशी खेळत आहे. आमच्या हक्काच्या सणालाही लोकप्रतिनिधींना जाग येत नसेल, तर या लोकप्रतिनिधींचा काय फायदा?
सुनिल रिकामे,
नागलोली






