कंपन्यांना भंगार माफियांचा विळखा

Old pickup truck carring scrap metal for recycling factory, isolated with clipping path.

मुंबई-गोवा महामार्गासह पेण परिसरातील काही भंगार माफियांचा सुळसुळाट

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्हयात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. वेगवेगळ्या कंपन्या जिल्ह्यामध्ये उभ्या राहत आहेत. मात्र, याच कंपनीतील स्टील, केमिकल, शाम्पू, औषधांचा परस्पर अपहार होत असल्याची चर्चा जोरात रंगत आहे. ट्रकमधील चालकाला विश्‍वासात घेऊन हा गोरखधंदा चालविला जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाजवळील इंदापूर व पेण परिसरात माफियांचा सुळसुळाट सुरु आहे. कंपनीतील मालाच्या अपहाराबाबत कंपनी प्रशासन कामाला लागले आहे. ट्रक चालकावर लक्ष ठेवण्यासाठी जीपीएसचा आधार घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. रायगड पोलिसांना या भंगार माफियांनी खुले आव्हान केले आहे.

रायगड जिल्ह्यात दोन हजारहून अधिक लहान मोठे प्रकल्प आहेत. त्यामध्ये रोहा, महाड, खालापूर व पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात लहान मोठे कारखाने आहेत. या कारखान्यांद्वारे केमिकल तयार होण्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन तयार होते. कंपनीतील उत्पादनाची अन्य ठिकाणी वाहतूक ट्रकद्वारे केली जाते. मात्र काही भंगारविक्रेते ट्रक चालकाला विश्‍वासात घेऊन ट्रकमधील मालाचा परस्पर अपहार करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात सर्वात मोठे बेकायदेशीर भंगार विक्रेते आहेत. जिल्ह्यात अनेक म्हणजेच शेकडो लहानमोठे भंगार विक्रेते आपला व्यवसाय करतात. त्यातही मोठया भंगार विक्रेत्यांनी बेकायदेशीररित्या आपला व्यवसाय थाटून परिसरात दहशत निर्माण केली आहे. कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना भंगार विक्रेते राजरोसपणे व्यवसाय चालवितात. विविध भागात भंगार विक्रेत्यांनी आपले बस्तान बसविले आहे. रायगड जिल्ह्यातील स्थानिक पोलिसांशी हातमिळवणी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत इंदापूर परिसरात बंद असलेल्या एका धाब्यामध्ये कंपनीतील माल उतरविला जातो. तसेच पेण परिसरातदेखील हा गोरखधंदा भंगार विक्रेता चालवित असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रात्रीच्या वेळी हा प्रकार काही भंगार विक्रेते करतात. रात्रीच्यावेळी भोजनाच्या नावाने एका धाब्याजवळ ट्रक थांबविला जातो. ट्रक चालकाला विश्‍वासात घेऊन कमी किंमतीत ट्रकमधील केमिकल, स्टील परस्पर काढले जाते. वेगवेगळया ड्रममध्ये रसायन भरले जातेे. कंपनीतून निघणार्‍या रसायनाबरोबरच रॉ मटेरिअल, शाम्पू, औषधे काढून तो माल भिवंडीत पाठविला जातो. मात्र या धंद्यांवर पोलिसांचा अंकुश राहिला नसल्याचे दिसून येत आहे.

रायगड जिल्हयातील पेण, इंदापूरसह दादर, कोलाड, माणगांव विळे, रोहा येथील मोठे भंगार व्यावसायिक बेकायदेशीररित्या व्यवसाय करतात. त्याचे अनुकरण इतरांनीही करण्यास सुरवात केली आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडतो. याप्रकरणी अशा बेकायदेशीर भंगार विक्रेत्यांना आळा घालावा अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत राज्यपालांसह मुख्यमंत्री, गृहमंत्री पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती देण्यात आली आहे.

गोरखधंद्यावर अंकुश कधी राहणार
मागील काही महिन्यापुर्वी एका बंद कारखान्यात बनावट सिगारेटच्या धंद्यावर रायगड पोलिसांनी छापा टाकून करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यात काही ठिकाणी अनेक कारखाने व धाबे बंद स्थितीत आहे. या बंद धाब्यांसह कारखान्यांचा आधार घेत काही भंगार विक्रेते ट्रक चालकाच्या मदतीने कंपनीतील माल परस्पर लंपास करीत असल्याचा प्रकार समोर येत आहे. बंद कारखाने व धाब्यांवरील गोरखधंद्यावर अंकुश कधी राहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कंपनी प्रशासन लागले कामाला
कंपनीतील मालाचा अपहार काही ट्रक चालक भंगार वाल्यांच्या मदतीने करीत असल्याच्या तक्रारीनंतर कंपनीतील प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रात्रीच्यावेळी मालाची वाहतूक करणार्‍या ट्रक चालकावर लक्ष ठेवण्यासाठी कंपनीतील यंत्रणा तैनात केली आहे. तसेच अनेक ट्रकला जीपीएस बसविण्यात आले आहे.
Exit mobile version