बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा झाला होता मृत्यू
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीत धसवाडी येथील शेतकर्यांची चारा खाण्यासाठी रानात सोडलेली गाय बिबट्याच्या हल्ल्यात मृत झाली होती. त्या मृत गायीच्या नुकसानीची भरपाई शेतकर्याला मिळाली असून, वनविभागाकडून 15 हजार रुपयांचा धनादेश शेतकर्याला सुपूर्द करण्यात आला.
धसवाडी येथील शेतकरी आलो महादू दरवडा यांच्या गोठ्यातील गुरे ही नेहमीप्रमाणे जंगलात चारा खाण्यासाठी गेली होती. एक नोव्हेंबर रोजी जंगलातील दली भूखंड 14 ए येथे शेतकरी दरवडा यांची गाय मृत अवस्थेत आढळून आली होती. त्या गायीच्या जबड्याचा धास हिंस्त्र प्राण्याने हल्ला करून घेतला होता. सदर घटनेची स्थानिक कार्यकर्ते सुनील पारधी यांनी वन विभागाला दिली होती. त्यानंतर वन विभागाचे वनपाल सुहास म्हात्रे यांनी आपल्या वन विभागाचे कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता. संबंधित शेतकर्याला मदत मिळावी म्हणून आ. महेंद्र थोरवे यांनी वन विभाग वनक्षेत्रपाल उमेश जंगम यांना सूचित केले होते. वन विभागाने हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी आलो दरवडा यांची दुभती गाय मृत झाली असल्याचा अहवाल आपल्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवला होता. त्यानुसार वन विभागाने पाठपुरावा केल्यानंतर त्या गायीचे मृत्यूबद्दल शेतकर्यांना आर्थिक मदत मंजूर झाली. सदर मदतीचा आणि नुकसान भरपाईचा धनादेश वन विभाग नेरळ कार्यालयात शेतकरी आलो महादू दरवडा यांना देण्यात आला. बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या दुभत्या गायीसाठी शासनाच्यावतीने 15 हजारांच्या मदतीचा धनादेश शेतकर्याला देण्यात आला. त्यावेळी स्थानिक कार्यकर्ते ग्रामपंचायत माजी सदस्य सुनील पारधी, वनपाल सुहास म्हात्रे, वनरक्षक भूषण साळुंखे आदी उपस्थित होते.