| मुंबई | प्रतिनिधी |
अकरावी प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध होणार आहे. प्रवेश पोर्टलवर कनिष्ठ महाविद्यालय वाटपाची यादी उपलब्ध होणार असून, विद्यार्थ्यांना मोबाईलवरही मेसेजद्वारे माहिती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना 3 जूनपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
राज्यात अकरावी प्रवेशासाठी सुमारे 12 लाख 51 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 9 लाख 8 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहेत. यंदा पहिल्या गुणवत्ता यादीचा ‘कट ऑफ’ अधिक राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळणार नाही, त्यांना पुढील फेरीपूर्वी महाविद्यालयांचा पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’वर क्लिक करून संबंधित महाविद्यालयात कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. अकरावी प्रवेशाच्या एकूण पाच फेऱ्या होणार असून, दुसरी फेरी 5 जूननंतर जाहीर होईल. त्यानंतर उर्वरित फेऱ्या पार पडणार असून, 1 जुलै किंवा 15 जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.
उद्या अकरावी प्रवेशाची पहिली यादी
