खारघरमध्ये वाहतूक नियमन शिकवणारे पहिले उद्यान

। पनवेल । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असणार्‍या पनवेलमध्ये महापालिका प्रशासन वाहतूक नियमनाविषयी बालकांना साक्षर करणारे पहिले वाहतूक नियमनांचे (ट्रॅफीक) उद्यान खारघर वसाहतीमध्ये उभारणार आहे.

खारघर वसाहतीमधील सेक्टर 35 ए येथील 9500 चौरसमीटर जागेवर हे उद्यान उभारले जात आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या उद्यानाची मागणी केली होती. त्यानंतर पनवेल महापालिका प्रशासनाने हे उद्यान बांधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पनवेल महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांनी दिली. पनवेलमध्ये 260 हून शाळा व महाविद्यालये आहेत. सुमारे सव्वादोन लाख विद्यार्थी संख्या असलेल्या पनवेलमधील विद्यार्थ्यांना बालवयापासून वाहतूक नियमनाची साक्षरता असल्यास येथील अपघात टाळता येतील. प्रादेशिक परिवहन विभागाने बालकांना शालेय जिवनात उद्यानातील खेळातून वाहतूक नियमनाचे धडे मिळू शकतील यामुळे ट्रॅफिक पार्कची संकल्पना आखण्यात आली. या पद्धतीचे पार्क ठाणे महापालिकेने उभारले आहे. पनवेल महापालिका प्रशासनाने या ट्रॅफीक पार्कसाठी पुढाकार घेतला असून पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी या पार्कसाठी विशेष पुढाकार घेतला आहे.

सिडको मंडळाकडून खारघर वसाहतीमधील सेक्टर 35 येथील भूखंड क्रमांक 9 ए येथे उद्याणाचा भूखंड महापालिकेला मिळाला होता. त्याच उद्यानाच्या भूखंडावर वाहतूक नियमनाची माहिती विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी महापालिका सुमारे 16 कोटी रुपये खर्च करणार आहे. पालिकेने या ट्रॅफिक पार्कचा आराखडा बनविण्यासाठी असिम गोकार्ण यांची नेमणूक केल्यावर गोकर्ण यांनी ट्रॅफिकपार्कचा आराखडा निश्‍चित करुन पालिकेकडे सुपुर्द केल्यावर पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी या पार्कच्या बांधकाम निविदा प्रसिद्धीला आयुक्त चितळे यांनी मंजूरी दिल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांनी दिली. पालिका हे पार्क उभारण्यासाठी 15 कोटी 81 लाख रुपयांचा बांधकाम खर्च करणार आहे.

दोन दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने या ट्रॅफीक पार्कच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध केली असून पुढील दोन वर्षात या ट्रॅफीकपार्कचे बांधकाम पुर्ण करण्याचे पालिकेचे उदिष्ट आहे. हे ट्रॅफीक पार्क उभारणीची विशेष तरतूद महापालिका प्रशासनाने 2023 2024 च्या शहरातील मूलभुत सोयी सुविधेअंतर्गत केली होती. सध्या सेंट्रलपार्क या भव्य उद्याणामुळे खारघर आणि पनवेलला ओळख मिळाली आहे. पनवेल महापालिका विकसित करत असलेल्या ट्रॅफिक पार्कमुळे पनवेल व परिसरातील शेकडो शिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांच्या सहलींचे भविष्यातील नियोजन आखले जाईल.

काय असणार ट्रॅफिक पार्कमध्ये
बागेतील हिरवळीसोबत वाहतूकीचे नियमन शिकविणारी सिग्नल यंत्रणा, रस्ता ओलांडण्यासाठी सांकेतिक असलेले झेब्रा क्रॉसिंग, एकेरी मार्ग, दुहेरी मार्गाची वाहतूकीचे सांकेतिक चिन्ह, प्रत्यक्षातील मार्ग, पदपथावरील आरक्षित मार्ग, रस्ते नियमनासाठी सांकेतिक चिन्ह, स्वच्छतागृह, लहान हॉटेल, खेळण्याचा परिसर याचा समावेश आहे.
Exit mobile version