नारळ अर्पण करून शांत राहण्याचे, सुखरुप ठेवण्याचे आवाहन
| अलिबाग | प्रतिनिधी |
कोळी समाजाचा महत्वाचा सण म्हणून नारळी पौर्णिमेकडे पाहिले जाते. रायगड जिल्ह्यामध्ये गुरुवारी (दि.27) कोळी समाजाच्या वतीने नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विधीवत पुजा करून समुद्राला सोन्याचा मुलामा असलेला नारळ सायंकाळी अपर्ण करून शांत राहण्याचे आणि सुखरूप ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. पारंपारिक वेशभुषा करून नाचत, ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून समुद्रकिनारी पुजा करण्यात आली. जिल्ह्यात अलिबागसह अनेक भागात हा सण उत्साहात पार पडला.
नारळी पौर्णिमेनिमित्त रायगड जिल्ह्यातील कोळीवाडा सकाळपासून सजला होता. पताकांसह वेगवेगळ्या प्रकारची तोरणे उभारून संपुर्ण कोळीवाडा सजविण्यात आला होता. त्यामुळे सकाळपासूनच कोळीवाड्यांमध्ये एक वेगळा उत्साह दिसून आला. काही ठिकाणी नारळ फोडीचा कार्यक्रम घेण्यात आला. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन हा सण साजरा करण्यात आला. समुद्राला नैवेद्य देण्यासाठी महिलांनी नवनवीन पदार्थ तयार केले होते. संपूर्ण कोळीवाडा गजबजून गेला होता. सायंकाळी पारंपारिक वेशभुषा, अलंकार घालून अनेक जण मिरवणूकीत सामील झाले. डोक्यावर मानाचा नारळ घेऊन समुद्रकिनाऱ्यांपर्यंत मिरवणूक सायंकाळी काढण्यात आली. अलिबाग कोळीवाड्यासह आक्षी, नागाव, रेवस, मांडवा, मुरूड, श्रीवर्धन अशा अनेक कोळीवाड्यामधून मिरवणूक काढण्यात आली.कोळी गीतांच्या तालावर नाचत ही मिरवणूक समुद्रकिनाऱ्यांपर्यंत काढली. या मिरवणुकीसोबत डोक्यांवर कळश, पारंपारिक वेशभुषा करीत कोळी समाज सहभागी झाले होते. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक असे सर्वच मंडळी या मिरवणूकीमध्ये सहभागी झाले. ही मिरवणूक समुद्रकिनारी आणली. त्यानंतर सायंकाळी समुद्रकिनारी मिरवणूकीचा मोठा जल्लोष पहावयास मिळाला. अलोट गर्दी या परिसरात झाली होती. सर्वांनी समुद्राची विधीवत पुजा केली. कळशातील पाणी व सोन्याचा मुलामा असलेले नारळ समुद्राला अर्पण केले. समुद्राला शांत राहण्याचे, सुखरुप ठेवण्याचे आवाहन केले.
