‘केंड’च्या टोळधाडीने मासेमारी संकटात

जाळ्यात मिळतोत मासळीचे सांगाडे; मासेमारी ठप्प होण्याची शक्यता

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

कोकणातील अरबी समुद्रकिनारपट्टीत धोकादायक केंड माशांचे संकट आले असून, समुद्रात दालदी जाळीने पकडलेली मोठी मासळी केंड मासे फस्त करून सांगाडे शिल्लक ठेवत आहेत. असे शेकडो मासळीचे सांगाडे समुद्रात मिळाल्याने मच्छिमार हवालदिल झाले असून, मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, खोल समुद्रातील मोठी मासेमारी ठप्प होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती मच्छिमार नाखवा रोहन निशानदार, धनंजय गिदी, रामकृष्ण शेगजी यांनी दिली.

राजपुरी येथील रामकृष्ण विष्णू शेगजी यांची सहा सिलिंडर्स असणारी लंकेश्‍वरी ही मोठी नौका दालदी जाळी घेऊन खोल समुद्रात मासेमारीस गेली होती. मासेमारी करताना त्यांच्या जाळ्यात सुरमई, कुपा, रावस, मोर मासे अशा मोठ्या मासळीचे केवळ सांगाडेच सापडल्याने धक्काच बसला. केंड नावाच्या खतरनाक मासळीने जाळी फाडून मोठी मासळी फस्त केल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे सर्वच हादरून गेले. पुन्हा जाळी टाकली तरी मासळी फस्त केली गेली, त्यामुळे अखेर मासेमारी थांबवून नौका राजपुरी बंदरात आणली आणि घडलेला प्रसंग सांगितला. नौकेवरील खलाशी गणेश नागुटकर आणि जयेश शेगजी यांनी हे सांगाडे हातात घेऊन नुकसान आणि मेहनत मातीमोल गेल्याने टाहोच फोडला. आठवडाभर मासेमारी करून शेवटी हेच काय त्याचे फळ, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

काही केल्या संकटांची मालिका पाठ सोडत नसल्याने काही मच्छिमार हताश झाले आहेत. लाखो रुपयांच्या मासेमारी जाळ्या फाडल्या जात आहेत आणि मासळीचे सांगाडे मिळत असल्याने बहुतांश नौका मालक या प्रकाराने हवालदिल झाले असून, मासेमारी थांबवताना दिसून येत आहेत. केंड माशांमुळे मासेमारी सध्या बंद ठेवण्याची वेळ मच्छिमारांवर येऊन ठेपली आहे. हा प्रकार न थांबल्यास मुंबई, पुणे, नाशिक, ठाण्यासह राज्यात मच्छीची मोठी वानवा निर्माण होऊन उपलब्ध मासळीचे दरदेखील गगनाला भिडतील, अशी माहिती विविध भागांतून देण्यात येत आहे. काटेरी केंड मासे अरबी समुद्रात कोठून आणि कसे येतात याबाबत निश्‍चित माहिती नाही; मात्र त्यांची टोळधाड आल्यावर अत्यंत मोठे मासेदेखील नेस्तनाबूत होतात, अशी माहिती मच्छिमारांनी दिली. त्यामुळे मासेमारी ठप्प होऊन मुंबई मार्केटमध्ये देखील मासळीचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशी माहिती मुरूड, एकदरा, राजपुरी, दिघी येथे परतलेल्या मच्छिमारांनी दिली.

केंड मासा म्हणजे?
केंड मासे आहारात खाल्ले जात नाहीत. इंग्रजीत या माशाला पार्क्युपाईन पफर म्हटले जाते. हे मासे विषारीदेखील असतात. पावसाळ्यानंतर मासेमारी सुरू झाल्यावर वादळी पाऊस, वादळी वारे, अचानक समुद्रात झालेले बदलते वातावरण, जेलिफिशचे आक्रमण आणि आता केंड माशांचा हल्लाबोल यामुळे मच्छिमारांचे नुकसान झाले आहे. जितके पैसे कमावले त्याही पेक्षा गमावून कर्जाचा डोंगर उभा ठाकल्याने मच्छिमार तणावाखाली असल्याचे दिसून आले आहेत.

मासेमारीवर संकट
कोकणात रत्नागिरी, दाभोळ रायगडपासून पुढे ठाणे, मुंबई समुद्रकिनारपट्टीत केंड माशांचा सध्या मोठा संचार असून, मिळेल ती सर्व मासळी फस्त करीत आहेत. यामध्ये सुरमई, रावस, कुपा, मोर मासे, पापलेट आणि सर्व माशांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई मार्केटमध्ये मासळी नेऊन विक्री करणार्‍या नौकांची मासेमारी थांबली आहे. 10 तास मासेमारीच्या ऐवजी केवळ 2 तासच मासेमारी होत असून, त्यातही जाळीत मासळी फस्त केलेले सांगाडे अधिक मिळत आहेत.

Exit mobile version