एनडीएमध्ये फडकला ‘मराठी’चा झेंडा

महाराष्ट्रातील 32 उमेदवारांची झाली निवड
। मुंबई । वृत्तसंस्था ।
देशातील तिन्ही सैन्य दलांसाठी सर्वोत्तम अधिकारी घडवणार्‍या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या नौदल विभागाच्या निकालांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने घोषणा केली. नेव्हल अकादमी परीक्षा 2020 च्या निकालांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये 478 जणांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे यापैकी 32 जण हे महाराष्ट्रातील आहेत. निवड करण्यात आलेल्या 478 विद्यार्थ्यांपैकी अदित्य सिंह राणा याने सर्वाधिक म्हणजेच 1116 गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला आहे.निवड करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये दुसर्‍या क्रमाकांकावर नकुल सक्सेना असून त्याने 1077 गुण मिळवलेत. तर तिसर्‍या क्रमांकावर देवेन नामदेव शिंदे असून त्याने 1071 गुण मिळवलेत.सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाने घेतलेल्या लेखी परीक्षा आणि अनेक मुलाखतींच्या फेर्‍यांमधील चाचण्यांनंतर हे गुण प्रदान करण्यात आले असून प्राविण्यानुसार ही यादी तयार करण्यात आली आहे. संरक्षण दलाअंतर्गत काम करणार्‍या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाकडून भारतीय हवाई दल, नौदल आणि लष्करामध्ये नवीन उमेदवार निवडण्याचं काम पाहिलं जातं.

Exit mobile version