। खांब । वार्ताहर ।
मागील पंधरा दिवस सतत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे सर्वांची त्रेधातिरपीट उडाली असली तरी पुराचे पाणी भातशेतीला मात्र चांगले उपयुक्त ठरले असल्याने शेतकरीवर्ग समाधानी झाला आहे.
दरवर्षी पावसाला सुरू झाल्यापासून ठराविक दिवसांनंतर हमखास छोटे मोठे पूर येतात. परंतु या वर्षी पाऊस सुरू झाल्यापासून एकही पूर झाला नसल्याने शेतकरीवर्ग पुराच्या पाण्याच्या प्रतीक्षेत होता. चार दिवसांपूर्वी ठिकठिकाणी पूर आल्याने नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागल्याचे निदर्शनास आले. या पुराच्या पाण्याचा शेतकरीवर्गाला फार मोठा लाभ झाला असल्याचे शेतकरीवर्गाचे म्हणणे आहे. कारण पुराचे पाणी बरेच दिवस शेतात साठल्याने पुराच्या पाण्याबरोबर शेतात आलेला गाळही चार पाच दिवस शेतामध्ये तसाच राहिल्याने एक प्रकारे भातांच्या रोपांचे वाढीस फायदेशीर ठरत असल्याचे आपल्या अनुभवातून शेतकरीवर्गाने सांगितले.
पुराच्या पाण्याबरोबर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात आलेल्या गाळामध्ये माती, वाळूचे कण, कुजलेला पालापाचोळा आदींचा समावेश असल्याने हे सर्व घटक भात शेतीची सुपिकता वाढविण्यासाठी फायदेशीर ठरत असल्याने पिकांची चांगली वाढ होऊन पिकेही जोमदार येतात. एकंदरीत चार-पाच दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी आलेल्या पुरामुळे शेतकरीवर्ग चांगलाच समाधानी झाला आहे.