। अलिबाग । प्रतिनिधी ।
किल्ले रायगडावर यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार दि.6 जून व तिथीनुसार दि. 26 जून 2026 या रोजी साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याकरिता राज्यातील मोठ्या प्रमाणात शिवभक्त नागरिक आणि मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने आपत्ती व्यवस्थापनाकरिता उपाययोजना करण्यासाठी किल्ले रायगडावर चढण्या-उतरण्यासाठीच्या पायी मार्गावरील वाटचाल दि.30 मे व 31 मे या दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड-अलिबाग किशन जावळे यांनी जारी केला आहे.
या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मोठ्याप्रमाणात नागरिक उपस्थित राहणार असल्याने गर्दी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार हा बदल करण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता, मार्ग प्रकल्प विभाग, महाड (विशेष पथक रायगड किल्ला) यांच्या माहितीनुसार, 2023च्या किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या वेळी महादरवाजाच्या खालील बाजूस असलेल्या उंच कड्यावरून पडलेल्या दगडामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हे मोकळे दगड काढणे आवश्यक आहे. या कड्यावरील मोकळे दगड/दरड प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने काढण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई यांनी सहमती दर्शविली असून दि.30 व 31मे रोजी मोहीम राबविण्यात येणार आहे. यावेळी पायी मार्गाने गड चढ-उतार करणाऱ्या व्यक्तींना हानी पोहोचू नये, म्हणून रायगडावर जाणाऱ्या पायी मार्गावरील वाटचाल बंद केली आहे.
रायगड रोप वे राहणार सुरू
कार्यकारी अभियंता, मार्ग प्रकल्प विभाग, महाड व अध्यक्ष, दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई यांनी याकामी आवश्यक ती खबरदारी घेऊन मोकळे दगड हटविण्याचे काम पूर्ण करावे. जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड यांनी चित्त दरवाजा, नाणेदरवाजा, गडावरील शिरकाई मंदिर (होळीचा माळ) येथे पायी मार्गावरील जाण्या-येण्याच्या प्रवेशद्वाराजवळ आवश्यक पोलीस बंदोबस्त लावावा. या कालावधीत रायगड रोप वे सुरू असणार आहे.
