भातशेतीचे भवितव्य पावसाच्या हाती

परतीच्या पावसाची बळीराजाला चिंता

| चिरनेर | वार्ताहर |

यावर्षी चालू पावसाच्या हंगामात शेतात पेरणीच्या काळापासून पावसाची संततधार आणि कडक उन्हे यामुळे शेतकर्‍यांना दुबार त्रिबार पेरण्या करून, भात शेतीची लागवड करावी लागली. रोपांच्या झालेल्या नुकसानीमुळे भात शेतीचे भवितव्य राम भरोसे झाले होते. मात्र, नंतर पाऊस चांगला पडला, त्यामुळे भातशेतीला पोषक असे वातावरण मिळाले. त्यामुळे भातशेती उत्तम होऊ लागली. आणि काही दिवसातच शिवारात सोन्याची कणसे दिसू लागली. मात्र परतीच्या पावसाची नजर या तयार झालेल्या भात पिकांना लागू लागल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या सर्वत्र भातशेती कापणी योग्य झाली असून, काही प्रमाणात भात कापणीला सुरुवातही झाली आहे. शेतकर्‍यांनी लावलेले कर्जत जातीचे पीक तयार होण्याच्या स्थितीत आहे. मात्र, पावसाच्या भीतीने कापणीचे काम थांबविण्यात आले आहे. सद्यःस्थितीत रत्ना, कोलम, गंगोत्री अशी भात पिके तयार होऊन कापणी योग्य झाली आहेत. मात्र, परतीचा पाऊस सक्रिय झाल्याने कापणीच्या हंगामात बाधा आणत, भाताचे नुकसान करत आहे. यावर्षी काही प्रमाणात रोगराई वगळता उत्तम भातशेती तयार झाली आहे. त्यामुळे शेतकरीही शिवारातील पिवळी झालेली भातपिके पाहून आनंदात असल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. यावर्षी शिवारात सुंदर व भरघोस आलेल्या या भात पिकांचे परतीच्या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करू लागला आहे. त्यामुळे तोंडाशी आलेला घास परतीचा पाऊस हिरावून घेतोय की काय याची भीती शेतकर्‍यांना लागून राहिली आहे.

Exit mobile version