युवा पिढीच्या हाती समाजाचं भविष्य – प्रा.क्लिटस झुझार्टे

। पेण । वार्ताहर ।
‘समाजाचं भविष्य आजच्या युवा पिढीच्या हातात आहे. आदिवासी मुली यास अपवाद नाही. कारण, त्या एक नव्हे तर, दोन कुटुंबांचा उद्धार करू शकतात,’ असे प्रतिवादन निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालय, मुंबईचे प्रा. क्लिटस झुझार्टे यांनी केले. ते अंकुर ट्रस्ट व लोकमंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा प्रशिक्षण शिबिरामध्ये मार्गदर्शन करीत होते. हे प्रशिक्षण मैत्रेय-राज फाऊंडेशन, म्हाडा कॉलनी, पेण येथे घेण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील उपस्थित होत्या.

कोरोना काळामध्ये अनेक मुलामुलींच्या शाळा सुटल्या, यामध्ये युवतींचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर होते. एकतर पोट भरण्यासाठी आई-वडिलांच्या मदतीला त्या शाळेतून बाहेर निघाल्या किंवा त्यांची लग्न तरी झालीत. या सर्व कारणांमुळे बालविवाह आणि बालमजुरी याच्या शिकार आदिवासी युवती मोठ्या प्रमाणावर होताना दिसतात आणि म्हणूनच अंकुर ट्रस्ट या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन तालुक्यातील 20 आदिवासी वाड्यांतील युवतींना एकत्र करून प्रशिक्षण शिबिराची एक साखळी तयार केलेली आहे.

या साखळीत निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्कचे विद्यार्थी निकिता तातुगडे, रिद्धी जैन, सईद खान, श्रीकांत काटे हे सध्या पुढाकार घेत आहेत. अंकुर ट्रस्टमार्फत आयोजित केलेल्या प्रशिक्षणामध्ये उद्घाटनपर भाषणामध्ये प्राध्यापक क्लिटस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या शिबिरामध्ये विविध खेळ, दृकश्राव्य माध्यमातून चित्रफीत आणि त्यावर चर्चा हे घेत युवतींनी शिबिराचा आनंद घेतला. या शिबिरामध्ये एकूण 30 मुलींनी सहभाग घेतला. या मुली प्रत्येक वाडीच्या प्रतिनिधी होत्या. शिबिराची सांगता सहभोजनाने करण्यात आली. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी गौरी दळवी, मीनल सांडे, रश्मी रोडेकर, श्‍वेता देसाई यानी परिश्रम घेतले.

व्यक्तिमत्त्व विकास ही आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारच्या शिबिरांमुळे मुलींमधील फक्त आत्मविश्‍वासच वाढत नाही, तर स्वप्रतीमासुद्धा उंचावते. ज्या मुलींची स्वप्रतिमा उंचावलेली आहे, त्या समाजामध्ये सक्षमपणे पुढे चालून नेतृत्व करू शकतात.

– डॉ. वैशाली पाटील, सामाजिक कार्यकर्त्या



Exit mobile version