सत्तेचा खेळ, जनता बेहाल

प्रांताधिकारी नाही, तहसीलदार रजेवर
दाखले मिळण्यास विलंब; पालक मेटाकुटीस

। रोहा । प्रतिनिधी ।
राज्यात सत्तेचा खेळ रंगला असला तरी रोहा तालुक्यात मात्र कायमस्वरूपी प्रांताधिकारी नाही, तहसीलदार रजेवर असल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले मिळण्यास होणार्‍या विलंबामुळे पालक आणि विद्यार्थी वर्ग मेटाकुटीला आला आहे.

दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाल्यापासून जातीचे दाखले, उत्पन्नाचे तसेच नॉन क्रिमीलेयर दाखले, डोमीसाईल दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थी व पालक तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयात गेले असता तहसीलदार रजेवर आहेत. प्रांताधिकारी पेण यांच्याकडे रोहा प्रांत कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार असल्याने दाखले पेण येथे जातात, यामुळे उशीर होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्रीपद रोह्यात आहे. याशिवाय भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे आमदारदेखील रोहा तालुक्यात आहेत. पण, सत्तेचा खेळ खेळण्यात मग्न असणार्‍या या लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्‍नांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने जनता मात्र विविध प्रकारचे दाखले मिळवताना हवालदिल झाली आहे. विकास म्हणजे, केवळ इमारती, रस्ते, समाजमंदिरे नाही, तर नागरिकांना शासकीय कार्यालयात सुलभतेने कागदपत्रे उपलब्ध होणे हेदेखील गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सर्व सरकारी कार्यालयात पालकमंत्री कक्ष उभारून जनतेच्या समस्या जाणून घेऊन निराकारण करण्यात येईल, असे दोन वर्षांपूर्वी सांगितले होते. पण, तालुक्यातील एकाही सरकारी कार्यालयात असे कक्ष सुरू असल्याचे दिसून येत नाही. सत्तेचा खेळ महत्त्वाचा असल्याने जनता बेहाल झाली तरी बेहत्तर, असेच लोकप्रतिनिधीचे वागणे दिसून येत आहे.

सध्या विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता आहे. पण, रोहा तालुक्यात प्रांताधिकारी पूर्णवेळ नाहीत किंबहुना या कार्यालयाचा कारभार ते पेण येथील कार्यालयात बसून करत असल्याने विद्यार्थी व पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, वेळ आणि पैसा दोन्हींचा अपव्यय होत आहे. पण, कोणीही लक्ष देत नसल्याने विद्यार्थी व पालक हवालदिल होत आहेत.

मनोज भायतांडेल, पालक, न्हावे

दाखले मिळवण्यासाठी तहसीलदार कार्यालयात वारंवार फेर्‍या माराव्या लागत आहेत. वडिलांचे दुकान असल्याने ते जास्त वेळ देऊ शकत नाहीत. सेतू कार्यालयातून परिपूर्ण माहिती मिळत नाही.

वैष्णवी जाधव, विद्यार्थिनी
Exit mobile version