प्रशासनाकडून तारीख पे तारीख
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचे दरवाजे अद्याप बंदच असून, प्रशासनाकडून तारीख पे तारीख देण्यात येत आहे. मागील चार दिवसांपासून जोरदार पावसामुळे किल्ल्यातील साफसफाईचे काम थांबविण्यात होते, परंतु आता वातावरण चांगले असल्याने सफाईचे काम जोरात सुरू आहे. येत्या 6 ऑक्टोबरला किल्ल्याचे दरवाजे पर्यटनासाठी उघडणार, अशी माहिती पुरातत्व विभागाने दिली आहे.
जंजिरा किल्ल्याचे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात दरवाजे बंद केले जातात. यामुळे या पावसाळी तीन महिन्यांत किल्ल्याच्या आतील आजूबाजूला भिंतीवर व परिसरात मोठ मोठी झाडे व गवत वाढते. त्यामुळे या ठिकाणी सरपटणारे प्राणी असू शकतात. त्यांच्यापासून पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दुष्टीने पुरातत्व विभागाने 13 सप्टेंबरला किल्ला सफाईला सुरुवात केली होती. परंतु, जोरदार पाऊस व वार्यामुळे सफाईच्या कामाला अडथळा येत असल्याने किल्ल्याचे दरवाजे उघडण्यात तारीख पे तारीख पडत आहे, अशी माहिती सहायक संवर्धक पुरातत्व विभाग अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.
ते म्हणाले की, महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून किल्ल्याचे दरवाजे उघडण्यात येणार होते. परंतु, गेले चार-पाच दिवस जोरदार वारा व पावसामुळे सफासफाईच्या कामाला अडथळा निर्माण झाला होता. काम थांबवून घरी परतावं लागतं होते. यामुळे दिवस वाढले; परंतु आता वातावरण चांगले असल्याने किल्ला सफाईला वेग आला आहे. 21 कामगारांबरोबर आमच्या कार्यालयातील बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुंगरे हे स्वतः साफसफाई करत आहेत. येत्या 6 ऑक्टोबरला पर्यटकांसाठी किल्ल्याचे दरवाजे नक्की उघडणार, असे बजरंग येलीकर यांनी सांगितले.