जंजिरा जलदुर्गाचे दरवाजे बंद

पावसाळी सुरक्षास्तव मेरिटाईम बोर्ड आणि पुरातत्व खात्याचा आदेश

| मुरूड । वार्ताहर ।

पर्यटन क्षेत्रात लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ असलेल्या महाराष्ट्रात मुरूड तालुक्यातील जंजिरा जलदुर्ग पावसाळ्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव (दि.26) मे पासून (दि.31) ऑगस्टपर्यंत पर्यटकांना पाहण्यास बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अलिबाग- मुरूड पुरातत्व विभागाचे आधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली. पावसाळ्यात खोरा जेट्टी अथवा राजपुरी जेट्टीवरून बाहेरून पाहता येईल. मात्र, समुद्रात जाण्यास बंदी असेल.

बजरंग येलीकर पुढे म्हणाले की, समुद्रातील सुरक्षिततेच्या कारणास्तव दरवर्षी जंजिरा जलदुर्ग (दि.25) किंवा (दि.26) मेपासून पर्यटकांना आतून पाहण्यासाठी बंद केला जातो. पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची आहे. या कालावधीत समुद्राच्या मोठ्या लाटा उसळत असल्याने धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी शासकीय स्तरावरून निर्णय घेतला जातो. (दि.26) मे पासून जंजिर्‍याचे दरवाजे बंद करावेत, अशा स्वरूपाचे आदेश मेरिटाईम बोर्ड आणि पुरातत्व खात्याला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार निर्णय घेतला जाईल अशी माहिती बजरंग येलीकर यांनी दिली.

22 एकर जागेवर उभ्या असलेल्या जंजिर्‍यात 19 बुरुज आहेत. जंजिरा जलदुर्ग पश्‍चिम समुद्र किनारपट्टीवर बलदंड जलदुर्ग असून इतिहासात अपराजित जलदुर्ग मानला जातो. मुरूड तालुक्यातील राजपुरी समुद्र खाडीत 350 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या जंजिर्‍याचे बांधकाम चुनखडी आणि शिशाचे असून हा जलदुर्ग तत्कालीन स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना देखील मानला जातो. जंजिर्‍यात सुमारे 100 ते 125 तोफा आहेत. पैकी लांडा कासम, गायमुख, कलाल बांगडी या तीन लांबपल्याच्या मोठ्या तोफा पंच धातूच्या असून अन्य लोखंडी आहेत. देश, राज्य आणि परदेशातून दरवर्षी सुमारे 5 लाख पर्यटक जंजिर्‍याला भेट देतात. दिवसेंगणिक ही संख्या वाढती आहे. खोरा जेट्टी, राजपुरी जेट्टी आणि दिघी जेट्टी या तीन ठिकाणाहून जंजिर्‍यात जाता येते. राजपुरी येथून शिडाच्या बोटीने तर अन्य दोन ठिकाणी मोटरलाँचने जंजिर्‍यात जाण्याची सुविधा उपलब्ध आहे. पाण्यात असलेल्या जंजिर्‍यात ज्येष्ठ नागरिक, छोटी मुले आणि पर्यटकांना सुरक्षित आणि सुलभपणे उतरता यावे, यासाठी जलदुर्गाच्या पाठीमागे समुद्राच्या बाजूकडून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने प्रशस्त रुंद जेट्टी उभारण्याचे काम सुरू केले आहे. जंजिर्‍यात प्रवेश करण्यासाठी सध्या असलेल्या राजपुरी गावासमोरील प्रवेशद्वाराजवळ पर्यटकांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने नवीन जेट्टीचे बांधकाम सुरू असून लवकरच सदर जेट्टीचे काम पूर्ण केले जाईल. अशी माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे.

Exit mobile version