रविवारपासून किल्ला पर्यटकांसाठी खुला
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
पावसाळ्यात बंद असलेला मुरूडचा प्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग रविवार, दि. 6 ऑक्टोबरपासून पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात येत असल्याची माहिती मुरूड-अलिबाग पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी शनिवारी (दि. 5) दिली.
पावसाळ्यात जूनपासून तीन महिने जंजिरा पर्यटकांना पाहण्यासाठी बंद ठेवण्यात येतो. परंतु, यंदा वादळी हवामान, मजुरांची कमतरता अशा अनेक अडचणी आल्याने जलदुर्गाची आतील स्वच्छता सप्टेंबर महिन्यात उशिरा सुरू झाल्याने कुलूपबंद जंजिरा सुरू करण्याबाबत दिवस पुढे ढकलले जात होते. त्यामुळे पर्यटकांनी मुरूडकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत होते. शिवाय, पर्यटन व्यवसाय ठप्प असल्याचे दिसून येत होते. जंजिरा सुरू करावा, अशी सातत्याने मागणी होताना दिसत होती.
जंजिर्याचे एकूण क्षेत्र 22 एकर असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात असणार्या क्षेत्राची स्वच्छता कमी वेळात होणे अवघड असते. किल्ल्यात पर्यटकांचा अधिक वावर असणारे महत्त्वाचे मार्ग, रॅम्पस आदी महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छता पूर्ण झाल्याने अखेर जंजिरा रविवारपासून पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात येत असल्याचे बजरंग येलीकर यांनी सांगितले.
पर्यटनाला उर्जितावस्था
जंजिरा पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून पर्यटक येत असतात. दिवसागणिक ही संख्या वाढती आहे. जंजिरा सुरू होत असल्याने ठप्प झालेल्या पर्यटन व्यवसायाला उर्जितावस्था येईल, असे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा दिवाळीच्या वेळी काशीद, नांदगाव, मुरूड येथील किनारे गर्दीने फुलून जातील, अशी माहिती पर्यटन क्षेत्रातील अनुभवी मंडळींनी शनिवारी बोलताना दिली. दसर्यापासूनच पर्यटकांची वर्दळ सुरू होईल, असे ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.