बेपत्ता मुलीच्या वाटेकडे बापाचे डोळे

अलिबाग पोलीस ठाण्यासमोर थळ ग्रामस्थांची गर्दी

| अलिबाग | प्रतिनिधी |

एक वेगळ्या जिव्हाळ्याचे नाते म्हणून मुली व बापाकडे पाहिले जाते. मुलापेक्षा बापाचा मुलीवर खुप जीव असतो. याचा प्रत्यय गुरुवारी अलिबाग पोलीस ठाण्यासमोर दिसून आला. गेल्या चार दिवसापासून बेपत्ता असलेली मुलगी सापडली नाही. त्यामुळे बापाने अलिबाग पोलीस गाठत मुलीच्या वाटेकडे डोळे ठेवल्याचे चित्र दिसून आले. या बापासोबत गावातील ग्रामस्थांनीदेखील पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली.

अलिबाग तालुक्यातील थळ पालथी येथील 21 वर्षीय तरुणी तीन जुलै रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास दुकानात जाते असे घरात सांगून गेली. दुपार होत आली, तरीही ती घरी परतली नाही. त्यामुळे तिचा तिच्या घरातील मंडळींनी शोध सुरू केला. तरीही ती सापडली नाही. अखेर मुलगी हरविल्याची तक्रार अलिबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली.या घटनेचे गांभीर्य ओळखून अलिबाग पोलीसांनी शोध सुुरू केला. त्यावेळी गावातील एका तरुणानेच तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फूस लावून पळवून नेल्याचे उघड झाले. पोलीसांनी त्या तरुणाच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेतला.त्यातील काहींची चौकशी सुरु केली. परंतू चार दिवस होत आली, तरीही मुलगी सापडली नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी अकरा वाजता मुलीच्या बापाने अलिबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या पाठोपाठ गावातील ग्रामस्थांनीदेखील गर्दी केली.

यावेळी पोलीस निरीक्षक पवार यांना भेटण्यासाठी गेले. मात्र पोलीस निरीक्षक व्हीडीओ कॉन्स्फरन्समध्ये मग्न असल्याने ते मुलीच्या बापाला व ग्रामस्थांना भेटले नाही. पोलीस निरीक्षकांच्या भेटीसाठी एक ते दीड तास पोलीस कार्यालयासमोर जमाव जमला होता. अखेर पोलीस निरीक्षक पवार यांना ग्रामस्थांना भेटण्यास वेळ मिळाला. त्यांना भेटून मुलीच्या बापाने व ग्रामस्थांनी गाऱ्हाणे सांगितले.यावेळी पोलीस निरीक्षकांना व पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले असून लवकरच मुलीचा शोध घेण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र मुलगी कधी येईल या आशेवर बाप राहिला असल्याचे दिसून आले.

Exit mobile version