शासनाला सायकल योजनेचा विसर

विद्यार्थिनींवर पायपीट करण्याची वेळ

| नाशिक | प्रतिनिधी |

जिल्हा मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींच्या सायकलींकरिता एक रुपयाही शासनाने उपलब्ध करून दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी जिल्ह्यातील तीन हजार 82 विद्यार्थिनींवर शिक्षणासाठी पायपीट करण्याची वेळ ओढवली आहे.

शासनाने मुलींकरिता शिक्षणाच्या मोफत सुविधा निर्माण केल्या आहेत. शासन दरवर्षी मानव विकास कार्यक्रमातून आदिवासी तालुक्यातील आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना सायकल वाटप करते. घरापासून पाच किलोमीटरवर असलेल्या शाळा-महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी विद्यार्थिनींना या सायकली मोफत दिल्या जातात. मात्र, गेल्या शैक्षणिक वर्षात शासनाला या सायकलवाटपाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने गेल्या आर्थिक वर्षात तीन हजार 82 विद्यार्थिनींची योजनेसाठी निवड केली होती. त्यात सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ, कळवण, इगतपुरी, दिंडोरी, बागलाण तसेच नांदगाव या आठ तालुक्यांतून प्रत्येकी 400 विद्यार्थिनींचा समावेश होता. संबंधित विद्यार्थिनींना सायकलीचा लाभ देण्यासाठी एक कोटी 54 लाख 10 हजार रुपयांची मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आली होती; परंतु संपूर्ण शैक्षणिक वर्ष सरले तरीही विद्यार्थिनींना सायकल उपलब्ध झाली नाही. याबाबत पात्र विद्यार्थिनींकडून सातत्याने सायकलींसाठी पाठपुरावा केला जात होता. शासनाने निधीकरिता आखडता हात घेतल्याने विद्यार्थिनींच्या शिक्षणाची वाट खडतर बनली आहे.

Exit mobile version