। नेरळ । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महायुती सरकारकडून जनतेच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्या योजनांचा लाभ घ्यावा यासाठी शासनाच्या माध्यमातून नवनवीन शकला लढविल्या जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून शासनाने आपल्या सरकारच्या योजना सर्वदूर पोहचाव्या यासाठी आता गावागावातील भिंती रंगवण्याचे काम करीत आहे. त्यामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती असल्याने ग्रामीण भागात या जाहिराती विशेष लक्ष वेधून घेत आहेत. मात्र, सरकार अशा भिंती रंगवून काही कालावधीत या योजनांना देखील कात्री देण्याचे षडयंत्र तर आखणार नाही ना? अशी शंका नागरीकांमधून पुढे येत आहे.
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणूका महायुतीने आपल्या अडीच वर्षाच्या काळात राबविलेल्या सरकारी योजनांचा फायदा एनकॅश करून जिंकल्या आहेत. त्यात लाडकी बहीण योजना महायुती सरकारला विशेष लाभदायी ठरली होती. आता राज्य सरकारने आपल्या सरकारच्या सर्व योजना गावागावात शहराच्या सर्व प्रभागात पोहचवण्यासाठी कंबर कसलेली दिसून येत आहे. राज्यातील प्रमुख शहरे आणि गावागावात सरकारच्या योजना भिंतींवर दिसू लागल्या आहेत. सरकारच्या सर्व योजना शहरातील सार्वजनिक ठिकाणी दिसू लागल्याने रस्त्यातून ये-जा करणारे नागरीक थांबून भिंतीवर काय रंगवले आहे, हे पाहताना दिसत आहेत. दरम्यान, राज्य सरकार आर्थिक कारण पुढे करून अशा अनेक योजनांना कात्री देखील लावत आहे. त्यात निवडणूक फंडा म्हणून यशस्वी ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील नावावर काट मारली जात असल्याने योजनांमध्ये बुडालेल्या महाराष्ट्र सरकारकडून अनेक योजना कधी बंद झाल्या, त्याची गणती देखील लोकांना नाही. त्यामुळे सरकार अशा भिंती रंगवून योजनांना कात्री देण्याचे षडयंत्र तर आखत नाही ना? अशी शंका देखील नागरींकांमधून पुढे येत आहे.