शासकीय विश्रामगृह बनले मद्यपींचा अड्डा

नुतनीकरणासाठी अधिकाऱ्यांची टाळाटाळ

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

सार्वजनिक बांधकाम, वनविभाग आणि रायगड जिल्हा परिषदेचे विश्रामगृह समुद्रकिनारी आहेत. मात्र, कोरोना कालावधीत रुग्णासाठी वापरण्यात आलेली ही विश्रामगृहे आज धूळखात पडली असून मद्यपींचा उड्डा बनली आहेत. संबंधित विभागाने तातडीने तीन्ही विश्रामगृहांची डागडूजी व स्वच्छता करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

तिन्हीही विश्रामगृहे हे समुद्रकिनारी असल्याने इमारतीच्या पायरीला समुद्राचे पाणी स्पर्श करते. विश्रामगृहातूनच समुद्राचे दर्शन होते. त्यामुळे या ठिकाणी राहायला मिळावे, अशी सर्वांचीच इच्छा असते. कोराना काळात विश्रामगृह आरोग्य विभागाला वर्ग केल्याने 4 वर्षात त्याची कोणतीही दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे विश्रामगृहाची पार दुरावस्था झाली आहे. प्रवेशद्वारावर काटेरी झाडांचे जंगल तयार झाले आहे. भिंतींवर झाडे उगवली आहेत. 4 वर्षपूर्वीच नूतनीकरण करून 2 वातानुकूलीत कक्ष व 3 साधे कक्ष बनवण्यात आले होते. त्यानंतर मुरुडला झालेल्या वादळात इमारतीवरील पत्रे उडून गेल्याने नवीन केल्येल्या कामाचे मोठे नुकसान झाले. नुकतेच आरोग्य विभागाने त्यांचे साहित्य नेले आहे. त्यांनी विश्रामगृहे सार्वजनिक बांधकाम खात्याकड वर्ग केली आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने विश्रामगृह नूतनीकरांसाठी 80 लाखाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यलयाला पाठवल्याची माहिती अभियंता माने यांनी दिली. अजूनही निधी प्राप्त झाला नसल्याने काम रखडले आहे.

रायगडच्या पालकमंत्र्यांनी विशेष निधी देऊन नूतनीकरणाचे काम तातडीने सूर करावे, अशी मागणी मुरुडकरांकडून होत आहे. 80 लाखाच्या प्रस्तावात परिसराची झाडी तोडणे, स्वछता करणे, इमारतीत भिजलेले फर्निचर बदलणे, वातानुकूलीत कक्ष पीओपीकरून अंतर्गत सुशोभीकरण करणे हि कामे होणार आहेत.

सद्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामगार नाहीत मग काम कसे करणार. दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर झाल्यावर काम सुरु करण्यात येईल. काम करण्यासाठी पुरसा निधी नाही.

गोरे, सार्वजनिक बांधकाम अधिकारी

आम्ही 2019 साली मुरुडला आलो होतो. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात राहिलो होतो. हे विश्रामगृह खूपच सुंदर होते. गॅलरीत उभे राहून जगातील सुंदर सूर्यास्त पाहायला मिळतो. आज आम्ही पुन्हा मुरुडला फिरायला आलो, परंतू विश्रामगृहाची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. रस्त्यावरून गेटमध्ये प्रवेश करू शकत नाही इतकी झाडी वाढली आहेत.

सुचिता मांढरे, पेण, पर्यटक

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहाची आज अतिशय वाईट परिस्थिती आहे. सदरची इमारत गंजली आहे, दरवाजे सडलेत, फर्निचर पावसाने भिजून खराब झाले आहे. त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव देऊन 4 वर्ष झाली निधी नाही, तर शासनाने हि जागा विकासकाला भाडेतत्वावर देऊन सुंदर इमारत बनवावी शासनाचा फायदा होईल व पर्यटकाना राहण्याची सोय होईल.

अरविंद गायकर, समाजसेवक
Exit mobile version