। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
युक्रेन-रशियामध्ये सध्या युद्ध सुरु असून चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. खासकरुन भारतातून युक्रेनमध्ये शिकायला गेलेले विद्यार्थी अथवा भारतीय नागरिकांच्या जीविताची काळजी वाढली त्यांना भारतात परत आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनमधून भारतामध्ये नागरिकांना परत आणण्यासाठी इतर काही मार्गांचा विचार केला जातो आहे. दुसरीकडे, युद्धासारख्या संकटाच्या परिस्थितीमध्ये विमान प्रवासाची किंमत ही नेहमीपेक्षा तिप्पट किंमतीने वाढल्याचं दिसून येतंय. यावर अनेक विद्यार्थी आणि नागरिकांनी चिंताही व्यक्त केली आहे. तसेच टीकाही करण्यात आली. वाढत्या तक्रारी लक्षात घेता आता युक्रेनमधील भारतीय नागरिकांसाठी भारत सरकार काही विमानांची व्यवस्था करणार आहे. या विमान प्रवासाचा खर्च सरकार उचलणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.







