कर्जत तहसीलची पायवाट हरवली गवतात; सामान्यांचे हाल

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला तहसील या सरकारी कार्यालयात शासकीय कामासाठी जावेच लागते. त्या तहसील कार्यालयाच्या कर्जत कचरा टेकडीवरील कार्यालयात जाण्यासाठी असलेली पायवाट गवतात हरवली आहे. दरम्यान, सामान्य लोकांची वाट म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग कधी गावात मुक्त करणार कामाकडे सामान्यांचे डोळे लागले आहेत. कर्जत तहसील कार्यालय हे कर्जत स्टेशनच्या बाजूला असलेल्या टेकडीवर आहे. या कार्यालयात सर्व लोकांची कामे असल्याने तेथे सतत वर्दळ असते, तर त्यातील 70 टक्के सामान्य लोक हे पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या पायर्‍यांवरून चालत जात असतात. पूर्वीच्या बीडीओ आणि आता कर्जत पोलीस निरीक्षक यांचा बंगला असलेल्या ठिकाणी हि पायवाट कर्जत तहसील कार्यालयात जाते. दरवर्षी पावसाळ्यात या पायवाटेच्या आजूबाजूला गवत वाढल्यानंतर त्या पायवाटेने जाणे अवघड होत असते. त्यात पावसाळ्यात गवत थेट पायवाटेच्या पायर्‍यांवर आल्याने सर्प रस्त्यावर येत असतात. दरवर्षी पायवाटेचा वापर करणार्‍या सामान्य जनतेला दरवर्षी कचेरीकडे जाणार्‍या पायवाटेच्या मार्गातील गावात काढण्याची विनंती तहसील कार्यालयाला करावी लागते. सार्वजनिक बांधकाम विभाग आपले नित्याचे काम का करीत नाहीत? आता डिसेंबर महिना संपत आला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला कर्जत कचेरीच्या पायवाट मार्गाकडे लक्ष द्यायला वेळ नाही याबाबत देखील संताप व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version