नागोठणे पोलिसांची कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक
| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे वेलशेत फाटा मार्गे रोहाकडे जाणार्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या मालवाहू डंपरमधून पडलेली खडी साफ करण्याची कार्यतत्परता नागोठणे पोलिसांनी दाखविली आहे. बुधवार, दि. 8 मे रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनातून भाएसो शैक्षणिक संकुल ते वरवठणे गावापर्यंतच्या रस्त्यावर पडलेली खडी मजुरांच्या सहाय्याने साफ केल्याने संभाव्य अपघात टळले. त्यामुळे नागोठणे पोलिसांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.
वेलशेत फाटा येथील भाएसो शैक्षणिक संकुल ते वरवठणे गावाकडे जाणार्या रस्त्यावर खडी पडल्याची व त्यावरून मोटारसायकलस्वार घसरत असून, यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याची माहिती वरवठणे गावातील किशोर म्हात्रे यांनी नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांना दिली. काळसेकर यांनी त्वरित नागोठणे पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार एम.के. रुईकर यांना या घटनेची माहिती देऊन तात्काळ घटनास्थळी जाण्यास सांगितले. रुईकर यांनीही त्वरित घटनास्थळी जाऊन काही स्थानिक कामगारांना बोलवून रस्त्यावरील खडी झाडूच्या सहाय्याने साफ करुन रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला. त्यामुळे वाहनांचा विशेष करून मोटारसायकलस्वारांचा या खडीवरून घसरून अपघात घडण्याचा धोका टळला.
याआधीही नागोठणे-रोहा मार्गावर धाटाव येथील कंपनीत जाणार्या एका टँकरमधून रस्त्यावर तेलगळती झाल्याने त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे काम नागोठण्याचे सपोनि हरेश काळसेकर व त्यांच्या टीमने केल्याने त्यावेळीही संभाव्य अपघात टळले होते. एकीकडे नागोठणे पोलीस आपली कार्यतत्परता दाखवून कर्तव्य बजावत असतानाच ओव्हरलोड वाहतुकीकडे मात्र पेण आरटीओ कार्यालयाने दुर्लक्ष केल्याने वाहन चालकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
जेएसडब्ल्यू कंपनीची खडीची नियमबाह्य वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करण्याचे काम आमच्या कर्मचार्यांकडून सुरु करण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात जेएसडब्ल्यू प्रशासनालाही लेखी आदेश पारित करण्यात आले असून, यासंदर्भात सर्व संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
महेश देवकाते,
पेण प्रादेशिक परिवहन अधिकारी







