| पंचकुला | वृत्तसंस्था |
हरियाना येथील पंचकुला येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेत खेळाडूंचा कस लागणार आहे. नवी दिल्ली येथून राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेतील (नाडा) 30 पेक्षा जास्त उत्तेजक नमुना चाचणी अधिकारी येथे आले असून त्यांच्याकडून विशिष्ट खेळाडूंची उत्तेजक नमुना चाचणी घेण्यात येणार आहे.
एका उत्तेजक नमुना चाचणी अधिकाऱ्याकडून याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले की, पॅरिस ऑलिंपिक आधीची ही ॲथलेटिक्समधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. मोठ्या संख्येने आमचे अधिकारी येथे पोहोचले आहेत. काही विशिष्ट खेळाडूंच्या उत्तेजक चाचण्या घेण्यात येणार आहेत. मी आता अधिक काही सांगू शकत नाही.
दरम्यान, गुरुवारी सकाळी ज्या खेळाडूंच्या लढती पार पडल्या, त्या खेळाडूंच्याही चाचण्या करण्यात येणार आहेत. तसा करारही करण्यात आला आहे. नाडाचे अधिकारी स्पर्धा सुरू होण्याआधी एक दिवस अर्थातच बुधवारी येथे दाखल झाले. स्पर्धेच्या काळामध्ये खेळाडूंची उत्तेजक चाचणी करण्यात आली नाही, पण नाडाचे अधिकारी दाखल झाल्यानंतर बुधवारी काही खेळाडूंची उत्तेजक चाचणी घेण्यात आली असावी. तेजस्वीन, सर्वेश अंतिम फेरीत पुरुषांच्या उंच उडी प्रकारात तेजस्वीन शंकर, सर्वेश कुशारे यांनी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. तेजस्वीन याने पात्रता फेरीत पहिला, तर सर्वेश याने दुसरा क्रमांक पटकावला. दोघांनीही 2.10 मीटर उंच उडी मारली.