बाल्या नृत्याचा वाढती क्रेझ; गावागावात सराव

| अलिबाग | प्रमोद जाधव |

रत्नागिरी जिल्ह्यातून उगम झालेला बाल्या नृत्य आधुनिकतेच्या युगात कालबाह्य होण्याच्या मार्गावर होता. मात्र आजही रायगड जिल्ह्यात पारंपारिक बाल्या नृत्याकडे तरुणाई आकर्षित आहेत. गोपाळकालानिमित्त दहीहंडीच्या कार्यक्रमाच्यावेळी सुरु होणाऱ्या नृत्य प्रकाराचा क्रेझ वाढत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गावागावात वाड्या वस्त्यांमध्ये बाल्या नृत्याचा सराव जोमाने सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे.

कोकणातील बाल्या किंवा जाखडी नृत्याकडे लोककला म्हणून पाहिले जाते. गणेशोत्सवाच्या कालावधीत गावागावात बाल्या नृत्याचे सादरीकरण केले जाते. गवळण, गौरी, गणपतीचे गाणी, तसेच एखादे संदेश देणारे गाणी गाऊन जनजागृती करण्याचे काम बाल्या नृत्याद्वारे करण्यात आले आहे. त्यामुळे कोकणात बाल्या नृत्याला महत्व प्राप्त झाले आहे. कोकणातील बाल्या नृत्याचे सादरीकरण रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर पासून आता अलिबाग, कर्जत, खालापूर तालुक्यातदेखील केले जात आहे. या नृत्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.

मोबाईलच्या जगतामध्ये रमणारी तरुणाई आजही या नृत्याकडे आकर्षित असल्याचे पहावयास मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या नृत्याचा सराव रायगड जिल्ह्यातील गावे, वाड्या वस्त्यांमध्ये जोमाने सुरु आहे. या नृत्याची सुरुवात दहीहंडी कार्यक्रमाच्या दिवशी करण्याची परंपरा आहे. या नृत्यामध्ये 10 वर्षापासून 25 वर्ष वयोगटातील तरुण मंडळींसह ढोलकी, घुंगरू, कोरस देणारे व गाणाऱ्यांचाही सहभाग असल्याचे दिसून आले आहे.

बाल्या नृत्य हा पारंपारीक नृत्य प्रकार आहे. कोकणातील प्रसिध्द नृत्य महाजने येथील श्रमिक नाच मंडळाच्यावतीने गेली 40 वर्षापासून गावामध्ये केले जात आहे. वयस्कर मंडळींसह तरुणमंडळीदेखील या खेळामध्ये आकर्षित झाली आहेत. गोपाळकालानिमित्त दहीहंडी फोडण्याच्या अगोदर या नृत्याला सुरुवात होते. त्याचा सराव गेल्या अनेक दिवसांपासून चालत आहे.
समीर पाटील – महाजने

Exit mobile version