अंधश्रद्धेचा कहर! स्मशानभूमीत अल्पवयीन मुलीची पूजा

। सातारा । वृत्तसंस्था ।
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या सुरूर येथील अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुरूर गावातील स्मशानभूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला आहे. त्यावेळी तिच्यासमोर विविध साहित्य मांडल्याचे दिसत होते. यावेळी तिथे गेलेल्या स्थानिक तरुणांना काही नाही, तिला त्रास होत होता म्हणून हे सुरू आहे, फक्त कोंबडा मारुन नेणार आहोत, असे एका महिलेने सांगितले. हा प्रकार पुण्यातील मांत्रिक व मुलीच्या नातेवाईकांकडून घडला आहे. दरम्यान हा प्रकार स्थानिक युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी आणि तिचे नातेवाईक बेपत्ता झाले आहेत. या प्रकारामुळे चर्चेला उधाण आले आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे खराडे यांनी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या असून त्यान्वये पोलिस निरीक्षक आशिष कांबळे करत आहेत.

अंधश्रद्धेचा कहर! मांढरदेव येथील काळूबाईच्या दर्शनासाठी येणारे भाविक सुरूर गावातील दावजी पाटील मंदिरात दर्शनासाठी भेट देत असतात. या मंदिरात तांत्रिक मांत्रिक काही अघोरी प्रकार करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर या मंदिर परिसरातील अंधश्रद्धेचे प्रकार पोलीस हस्तक्षेपाने बंद करण्यात आले होते. मात्र मंदिरापासून जवळच्या अंतरावर असणार्‍या स्मशानभूमीत ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Exit mobile version