। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत रेल्वे स्थानकात एकूण तीन फलाट व ईएमयु फलाट आहे. परंतु, फलाट क्रमांक तीन वरची उंची कमी असल्यामुळे लोकल किंवा एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढताना खूपच गैरसोय होत असते. फलाट आणि गाडीच्या दरवाज्यामध्ये खूपच अंतर असल्याने एखादा प्रवासी दोघांच्या मध्ये अंतर असल्या कारणाने पडून जखमी होऊ शकतो. या बाबतीत सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी पाठपुरावा केल्याने आता फलाटाची उंची वाढविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
तीन क्रमांकाचा फलाट आणि लोकल किंवा एक्सप्रेस गाडीच्या दरवाजामध्ये मोठे अंतर असल्याने गाडीत चढताना किंवा घाईत गाडी पकडताना प्रवासी मधे पडून जखमी होऊ शकतो. प्रसंगी एखाद्या प्रवाशाला आपला जीव गमवावा लागेल. यासाठी काही प्रवाशांनी सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. ओसवाल यांनी वरील समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन गाडी आलेली असताना फलाटची पाहणी केली व रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू केला. अखेर रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक तीनची उंची वाढविण्याचे काम सप्टेंबर 2021 मध्ये सुरु करणार असल्याचे लेखी उत्तर ओसवाल यांना दिले.
कर्जत येथील फलाट क्रमांक तीन वरील उंची वाढविण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे व जोपर्यंत सदर काम होत नाही, तोपर्यंत आपण आपला पाठपुरावा सुरूच ठेवणार.
पंकज मांगीलाल ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते, कर्जत.