| रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात महा आवास अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मध्ये रायगड जिल्ह्यातील 15 हजार 560 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले असून, 11 हजार 791 लाभार्थ्यांना लाभाचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे. यापैकी 8 हजार 103 लाभार्थ्यांना लाभाचे वितरण शनिवारी (दि.22) करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी दिली आहे.
1 जानेवारी ते 10 एप्रिल 2025 या 100 दिवसांच्या कालावधीत ‘सर्वांसाठी घरे’ या शासनाच्या धोरणांतर्गत बेघरांना घरे देण्यासाठी घरकुलांना मंजुरी देण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 20242-25 मध्ये 15 हजार 560 लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आलेली असून, त्यांची मंजुरी पत्रे देण्यात आली आहेत. तसेच 11 हजार 791 लाभार्थ्यांना पहिला हप्ता मंजूर करण्यात आलेला असून, त्यापैकी 8 हजार 103 लाभार्थ्यांच्या पहिल्या 15 हजार रुपयांच्या हप्त्याचे वितरण शनिवारी जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील कार्यक्रमात करण्यात येणार आहे. तर, उर्वरित लाभार्थ्यांना पुढील काही दिवसात लाभाच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
100 दिवसांच्या कालावधीत करण्यात येणारी कामे
उद्दिष्टाप्रमाणे घरकुलाना मंजुरी देणे.
मंजूर घरकुलांना वेळेत हप्ते वितरीत करणे.
मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे.
जुनी प्रलंबित घरकुले पूर्ण करणे.
जागा नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे.
अन्य शासकीय योजनांशी कृतीसंगम करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे.
घरकुल लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचा वितरण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे, बालेवाडी येथे राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन 22 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हे, तालुके व ग्रामपंचायती येथेही एकाच वेळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण- टप्पा 2 दृष्टिक्षेप
तालुका | घरकुल मंजुरी | प्रथम हप्ता मंजूर |
अलिबाग | 144 | 116 |
कर्जत | 1841 | 1460 |
खालापूर | 674 | 505 |
महाड | 2810 | 2158 |
माणगाव | 1427 | 1099 |
म्हसळा | 1410 | 1036 |
मुरुड | 565 | 355 |
पनवेल | 237 | 171 |
पेण | 1642 | 1180 |
पोलादपूर | 1024 | 867 |
रोहा | 1379 | 911 |
श्रीवर्धन | 599 | 509 |
सुधागड | 1231 | 970 |
तळा | 502 | 393 |
उरण | 75 | 61 |
एकूण | 15560 | 11791 |