वाढत्या शहरीकरणाचा पोल्ट्री व्यवसायावर परिणाम

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शहरांचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि बदलती जीवनशैली यामुळे रायगड जिल्ह्यात चिकन व अंडी यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, याच शहरीकरणाचा विपरीत परिणाम पोल्ट्री व्यवसायावर होत असल्याचे चित्र समोर येत आहे. कोंबड्यांच्या विष्ठेमुळे निर्माण होणारी दुर्गंधी, तसेच नागरी आरोग्याच्या तक्रारींमुळे शहरालगतच्या भागातील अनेक पोल्ट्री व्यवसाय बंद पडू लागले आहेत. विशेषतः पनवेल आणि उरण परिसरात नागरिकीकरणामुळे पोल्ट्री व्यवसाय घटल्याचे सांगितले जात आहे.

रायगड हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जात असला, तरी पर्यटन क्षेत्रातही जिल्ह्याचे महत्त्व वाढले आहे. जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक लहान-मोठे प्रकल्प उभे राहिले असून, त्याचबरोबर पोल्ट्री व्यवसायही अनेक ठिकाणी सुरू आहे. चिकन व अंडी खाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने या व्यवसायाला मोठी मागणी आहे. प्रकल्प उभे राहिलेल्या भागात चिकन व अंडी विक्रीचा व्यवसाय तेजीत असून, जिल्ह्यातील नाक्या-नाक्यावर विक्री केंद्रे दिसून येतात. बदलत्या जीवनमानामुळे पोल्ट्री उत्पादनाच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे.

जिल्ह्यात साधारणतः तीन हजारांपेक्षा अधिक क्षमतेचे सुमारे 480 पोल्ट्री फार्म नोंदणीकृत आहेत. अलिबाग, पाली, रोहा, कर्जत या भागात पोल्ट्री फार्म मोठ्या प्रमाणात आहेत. या व्यवसायातून सुमारे 60 हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळत आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजना राबवून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तथापि, वाढत्या शहरीकरणामुळे या व्यवसायास अडचणी निर्माण होत आहेत. मुंबईजवळील पनवेल आणि उरण तालुक्यांमध्ये नागरीकरण वेगाने वाढत असून, त्या भागातील अनेक पोल्ट्री फार्म दुर्गंधीच्या कारणास्तव बंद करण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. याशिवाय पनवेल, खालापूर, कर्जत, उरण या भागात जमिनींचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे पोल्ट्री फार्म चालविण्यापेक्षा जमीन भाड्याने देणे किंवा विक्री करणे अधिक फायदेशीर ठरत आहे. जमिनीची उपलब्धता कमी होणे आणि वाढलेले दर यामुळे नवीन पोल्ट्री प्रकल्प उभारणे कठीण बनले आहे. एकीकडे चिकन व अंड्यांची मागणी वाढत असताना, दुसरीकडे शहरीकरणाच्या वाढत्या दबावामुळे पोल्ट्री व्यवसायासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे पोल्ट्री फार्म कमी असले तरी रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, पाली, रोहा, कर्जत या भागात पोल्ट्री व्यावसाय मोठ्या प्रमाणात आहे. तीन हजार पक्ष्यांची क्षमता असलेल्या 480 पोल्ट्रींची नोंदणी आहे. जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसायातून व्यावसायिकता विकास साधण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत योजना राबविण्यात येणार आहे.

डॉ. सचिन देशपांडे,
उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, रायगड
Exit mobile version