भारतीय संघ ‘या’ कारणांमुळे अंतिम सामन्यात ढेपाळला

। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।

आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये स्फोटक सुरुवात करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघानं अंतिम फेरीपर्यंत एकही सामना गमावला नाही. भारतीय संघानं स्पर्धेतील सर्व 10 सामने जिंकून अंतिम फेरीत थाटात प्रवेश केलेला. अशा परिस्थितीत भारतीय संघ विजेतेपद पटकावून इतिहास रचेल, असं दिग्गजांसह चाहत्यांनाही वाटत होतं. पण, 140 कोटी भारतीयांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (दि.19) अंतिम सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा सामना 5 वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात भारतीय संघ विजयी पताका फडकवणार असा विश्वास प्रत्येक भारतीयाला होताच, पण कांगारूंनी विजयरथावर स्वार झालेल्या भारतीय संघाला रोखलं आणि विश्वचषकावर नाव कोरलं.

भारतीय संघाच्या पराभवाची अनेक कारणं आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही संघ अयशस्वी झाला. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघानं 240 धावा केल्या आणि स्पर्धेत पहिल्यांदाच सर्वबाद झाला. यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघानं 4 खेळाडू गमावत विजेतेपद पटकावलं.

संपूर्ण सामन्यात कोहली, राहुल आणि रोहित यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला आपलं कौशल्य दाखवता आलं नाही. या सर्वांना अंतिम सामन्याचं दडपण सहन करता आलं नाही आणि ते अयशस्वी ठरले. सलामीवीर गिल आणि रोहित बाद झाल्यानंतर श्रेयसला चौथ्या क्रमांकावर जबाबदारी स्वीकारावी लागली, मात्र तो केवळ 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर रवींद्र जाडेजा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याच्यानंतर सूर्यकुमार सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, मात्र त्यांची अवस्था आणखीनच बिकट होती. त्यामुळे हे चारही फलंदाज विश्वचषक अंतिम सामन्यासारख्या मोठ्या सामन्याचं दडपण सहन करू शकत नसल्याचं स्पष्ट झालं. यापैकी कोणीही मैदानावर थांबून जरा चांगल्या रनरेटनं धावा केल्या असत्या तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

शुभमन गिल लवकर बाद
विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्याचं दडपण सलामीवीर शुभमन गिलला सहन करता आलं नाही. 30 धावांवर भारतीय क्रिकेट संघाला पहिला धक्का गिलच्या रूपानं बसला. 7 चेंडूत केवळ 4 धावा करून गिल बाद झाला आणि माघारी परतला. हाही संघासाठी मोठा धक्का होता. गिलनं आणखी काही धावा केल्या असत्या तर कर्णधार रोहित शर्मासोबत मोठी भागीदारी होऊ शकली असती आणि भारतीय संघाला मजबूत स्थिती पाहायला मिळाली असती. अंतिम सामन्यात हीच सर्वात मोठी जमेची बाजू टीम इंडियासाठी पराभवाचं कारण ठरली.
संथ फलंदाजी
शुभमन गिलनंतर दुसरा धक्का रोहित शर्माच्या रूपानं 67 धावांवर भारतीय संघाला बसला. त्यानंतर 81च्या धावसंख्येवर श्रेयस अय्यरच्या रूपानं तिसरा आणि सर्वात मोठा धक्का भारतीय संघाला बसला. त्यावेळी मात्र  भारतीय संघ अडचणीत आला होता. इथून विराट कोहली आणि केएल राहुल यांनी मिळून डावाची धुरा सांभाळली खरी, पण कांगारूंनी घातलेलं चक्रव्ह्यूह भेदणं त्यांना तेवढं शक्य झालं नाही आणि धावगती खूपच कमी केली.
स्पिनर्सचा 'फ्लॉप शो'
भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाला 241 धावांचं लक्ष्य दिलं तेव्हा चाहत्यांच्या आशा गोलंदाजांवर पल्लवीत झाल्या होत्या. येथे मोहम्मद शामीनं 1 आणि जसप्रीत बुमराहनं 2 बळी घेत खळबळ उडवून दिली. ऑस्ट्रेलियानं 47 धावांत 3  गडी गमावले होते. इथून सामना भारतीय संघाच्या हातात असल्याचं दिसत होतं. रोहित शर्मानं बुमराह-शामीनंतर तिसरा आणि चौथा गोलंदाज म्हणून जाडेजा-कुलदीप यादव या स्पिनर्सचा वापर केला होता. मात्र हे दोन्ही स्पिनर्स फ्लॉप झाल्याचं दिसून आलं. या दोघांनी आपली संपूर्ण षटकं पूर्ण केली आणि एकही बळी घेतला नाही. जाडेजानं 43 तर कुलदीपनं 56 धावा दिल्या. या दोघांनी प्रत्येकी 1 बळी घेतला असता तर सामन्याचा निकाल भारतीय संघाच्या बाजूनं लागण्याची अपेक्षा खूप जास्त होती. अशा प्रकारे, फिरकीपटूंचा फ्लॉप हे सर्वात मोठं कारण आहे.
सिराजची 'मियाँ जादू'ही फ्लॉप
कर्णधार रोहित शर्मानं वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला पाचवा पर्याय म्हणून ठेवलं होतं. कर्णधारानं डावातील 17 वं षटक सिराजला दिलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं 16 षटकांत 3 गडी गमावून 87 धावा केल्या होत्या. मात्र, सिराजची जादू काही चालली नाही. जर सिराजची जादू चालली असती, तर मात्र आज वर्ल्डकप आपल्याच हातात असता हे मात्र नक्की.
Exit mobile version