| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील डॉक्टर डी.वाय. पाटील स्टेडियमवर रविवारी दुपारी महिलांच्या एक दिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यासाठी प्रेक्षकांनी सकाळपासूनच स्टेडियम परिसरात गर्दी केली. महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे लाखो क्रीडा रसिकांचे लक्ष लागले असताना नेरूळ परिसरात पावसाला सुरुवात झाली असली तरी ऊन पावसाचा खेळ मात्र सामना सुरू होण्यापूर्वीच पाहायला मिळाला. दुपारी 3 वाजता सुरू होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीची सर्व तयारी पूर्ण झाली असली, तरी हजारो क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन बलाढ्य महिला संघांमध्ये रंगणाऱ्या अंतिम सामन्याची सर्व तिकिटे सोल्ड आऊट झाली असून, काही ठिकाणी या तिकिटांची पुनर्विक्री तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत होत असल्याची चर्चा होती. असे असले तरी डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये अंतिम सामना पाहण्यासाठी झालेल्या गर्दीने उच्चांक गाठल्याचे चित्र पहावयास मिळाले.
तिकिटे उपलब्ध नसल्याने काही जणांनी समाजमाध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. तर, तिकिट विक्रीबाबत वेळेवर माहिती दिली असती, तर चाहत्यांचा उत्साह कमी झाला नसता,अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. तर काही संकेतस्थळांवर प्रचंड दराने विकल्या जाणाऱ्या तिकिटांविषयी तक्रारही केली आहे. अनेकांच्या मते काही दिवसांपूर्वी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचे दर 150 रुपये इतके होते. मात्र,काही संकेत स्थळांवर हीच तिकिटे 3 ते 5 हजार रुपयांपर्यंत विकली गेल्याची माहिती काही क्रिकेट रसिकांनी दिली. काही तिकिटांचे दर तब्बल 1.3 लाख रुपयांपर्यंत पोहोचले. यापूर्वी डी.वाय.पाटील स्टेडियमच्या व्यवस्थापनाकडून क्रिकेट रसिकांसाठी स्टेडियमच्या गेटवर तिक्रिट विक्रीची सोय करून देण्यात आली होती. मात्र, भारतीय महिला संघ क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचल्यावर गेल्या तीन दिवसांपासून ही तिकीट विक्री बंद असल्याचे क्रिकेट रसिकांनी सांगितले. दरम्यान, शहरातील कॅफे आणि पब, सोसायट्यांमध्ये सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी स्क्रीन लावण्यात आले आहेत. अनेकांनी आपापल्या मित्रपरिवारासह हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी तयारी केली होती.
भारतीय महिला संघाने यापूर्वी 2005 व 2017 च्या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. परंतु, त्यांना विजयश्री खेचून आणता आली नाही. त्यामुळे आज नवी मुंबईतील डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियम वर घरच्या मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला घरच्या प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळणार असून, यंदा महिला विश्वचषक प्रथमच जिंकण्याची आशा क्रीडा रसिक ठेवून आहेत. अंतिम सामना रंगणाऱ्या डी . वाय पाटील स्टेडियम परिसरात भारतीय तिरंगा झेंडा 100 ते 200 रुपये तसेच भारतीय खेळाडूंची जर्सी 200 रुपये व भारतीय खेळाडूंची टोपी 100 ते दीडशे रुपये स्टेडियम परिसरात विक्रीसाठी उपलब्ध होते. त्यामुळे भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेल्या क्रीडा रसिकांची मोठी गर्दी या परिसरात पाहायला मिळत आहे. दुसरीकडे महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत असताना दुसरीकडे देश-विदेशातील प्रेक्षकही उपस्थित होते.







