55 ग्रामपंचायतींचा सहभाग
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीत वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याचे कार्य सुरु आहे. कर्जत पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील 55 ग्रामपंचायतीमध्ये 72 ठिकाणी आतापर्यंत वनराई बंधारे बांधण्यात आले. दरम्यान गटविकास अधिकारी यांच्याकडून प्रत्येक वनराई बंधाऱ्यांची पाहणी केली जात असून आणखी वनराई बंधारे बांधण्यात यावेत, अशी सूचना ग्रामपंचायती यांना करीत आहेत.
मुख्यमंत्री समृद्द पंचायत राज अभियाना अंतर्गत कर्जत तालुक्यातील प्रत्यके ग्रामपंचायतीमध्ये वनराई बंधारे बांधण्याची योजना आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेने रायगड जिल्ह्यात असा आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कर्जत पंचायत समिती अंतर्गत एका दिवसात सर्व 55 ग्रामपंचायतीमध्ये वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायतराज अभियान अंतर्गत वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रत्येक गावातून जास्तीत जास्त बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची प्रत्यक्ष पाहणी व वनराई बंधारा बांधण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून गट विकास अधिकारी सुशांत पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी बापूसाहेब नंदाळे, कृषी अधिकारी संजय चव्हाण, विस्तार अधिकारी उज्वला भालेराव, विस्तार अधिकारी विजय राजपूत तसेच सर्व ग्रामपंचायतचे यांचा सहभाग होता. तर प्रत्येक ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व ग्रामस्थ, महिला बचत गटातील महिला, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. या वेळेस तालुक्यातील सर्वच 55 ग्रामपंचायतीने सहभाग घेतला असून एकूण 72 वनराई बंधारे केवळ श्रमदान व लोकसहभागामधून बांधण्यात आले. या बंधऱ्याच्या माध्यमातून भुजल साठा वाढविण्यास मदत तसेच जमीनीची धूप थांबण्यास मदत होणार असल्याचे तालुका गट विकास अधिकारी सुशांत पाटिल यांनी सांगितले.
