आई फाऊंडेशनतर्फे मदतीचे आवाहन; पूरग्रस्तांसाठी आर्थिक, वस्तुरूपाने मदत
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्राला माणुसकीचा खरा अर्थ शिकवला आहे. आई फाऊंडेशन तर्फे उरण तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यातील दिव्यांगांनी आर्थिक व वस्तुरूपाने मदत जमा केली आहे.
पूरग्रस्तांसाठी अनेक सक्षम लोक पुढे येतात; परंतु, स्वतःच्या मर्यादा बाजूला ठेवून जेव्हा एखादा दिव्यांग व्यक्ती इतरांच्या दुःखासाठी पुढाकार घेतो, तेव्हा ती मदत नसून ती एक प्रेरणादायी आदर्शकथा बनते. आई फाऊंडेशन तर्फे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना आवाहन करण्यात आले होते की, आपल्या परीने शक्य तितके सहकार्य पूरग्रस्तांसाठी करूया. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यातील दिव्यांगांनी आर्थिक व वस्तुरूपाने मदत जमा केली आहे. या मदतीतून पूरग्रस्त मुलांसाठी शैक्षणिक साहित्य तसेच महिलांसाठी साड्यांचा समावेश करण्यात आला. ही संपूर्ण मदत आई फाऊंडेशनतर्फे एकत्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)पक्षाच्या महाराष्ट्र राज्य महीला सचिव व आधार सावली फाऊंडेशनच्या सल्लागार भावना घाणेकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे. भावना घाणेकर यांनी दिव्यांग बांधवांच्या या सहकार्याचे मनापासून कौतुक केले. त्यांनी सांगितले की, जे स्वतः सक्षम नाहीत त्यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करणे ही खरी माणुसकी आहे. हा उपक्रम महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल.
या कार्यक्रमात आई फाऊंडेशनचे मदन पाटील व रणिता ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, या मदतीत अशाही काही दिव्यांगांनी सहभाग घेतला ज्यांची आर्थिक आणि शारीरिक परिस्थिती अतिशय कठीण आहे. तरीही त्यांनी माणुसकीची जाण जपत योगदान दिले, हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. हा उपक्रम यशस्वी करण्याकरता मदन पाटील, उमेश पाटील, महेश पाटील, रणिता ठाकुर, संदेश राजगुरू, नितीन सांगवीकर, मिल्टन मिरंडा, निशा माने, राजश्री घरत आदी सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. उरण तालुक्यातील दिव्यांगांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि मदतीची प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक नवदिशा ठरणार आहे.







