हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त
| पुणे | प्रतिनिधी |
राज्यात मान्सूनची चांगल्या प्रकारे वाटचाल सुरु आहे. पावसासाठी पूरक वातावरण सध्या निर्माण झाले आहे. अशात राज्यात पुढील चार-पाच दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ. के.एस. होसाळीकर यांनी वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, पुण्यासह कोकणातील काही जिल्हे व विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे चार दिवस वादळी वार्यासह मुसळधार पावसाचे असणार आहे. तर मुंबई आणि पुण्यात घाट विभागातही जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यातदेखील 25 जूनपर्यंत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात वातावरणाच्या मधल्या थरात विदर्भ आणि लगतच्या भागावर वार्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे.
वातवरणातील हा बदल पावसासाठी पूरक आहे. त्यामुळे पुढचे पाच दिवस कोकणात बहुतांश भागात, मध्य महाराष्ट्रात पहिले दोन दिवस काही ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासह विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुण्यात असं राहील हवामानपुण्यासह परिसरातील हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास पुणे आणि परिसरात वातवरण सामान्य असेल. दरम्यान, पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजेच 23 रोजी देखील हलक्या स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. तर 24 ते 26 जूनदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. तर 27 जूनला घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही, असे हवामान विभागाने म्हटले आहे.