| छत्रपती संभाजीनगर | वृत्तसंस्था |
तीन वाहनांच्या विचित्र अपघातात महिला आणि एक वर्षाची चिमुकली जखमी झाली. दि.24 रोजी दुपारी साडेबारा वाजता एन-1 पोलिस चौकीजवळील चौकात, सिग्नलवर हा अपघात घडला आहे. या अपघातात कारखाली अडकलेल्या महिलेला नागरिकांनी बाहेर काढल्याने ती बचावली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी करिना चव्हाण (22) आणि तिची मुलगी प्रियंका (1) या दोघी एन-1 येथील सिग्नलवर रस्ता क्रॉस करीत होत्या. यावेळी जळगाव रोडने एक कार भर वेगाने सिडको बसस्टँडच्या दिशेने येत होती. या कारने चव्हाण मायलेकीला धडक दिली. या अपघातात कारचालकाने कार थांबवण्याचा प्रयत्न करीत असताना करिना चव्हाण या कारखाली अडकल्या, तर मुलगी काही अंतरावर पडली. गर्दीच्या ठिकाणी हा अपघात घडताच इतर वाहनधारकांनी मदतीसाठी धाव घेतली. पुष्पा हराळे या कारचालक महिलेने त्यांची कार थांबवत करीनाला कारखालून इतर नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. धडक लागल्याने या मायलेकी जखमी झाल्या होत्या. अपघातग्रस्त कार रस्त्यात उभी असतानाच पाठीमागून आलेल्या एका क्रुझरने या कारला धडक दिल्याने हा गोंधळ आणखी वाढला. नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली. सिडको पोलिस ठाण्याची पेट्रोलिंग व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.