खोरा बंदरात लाटांचा जोर वाढला

| मुरुड- जंजिरा | प्रतिनिधी |

मुरुड-खोरा बंदरातील समुद्र किनाऱ्यांवर लाटांचा जोर वाढला असून, जोराचे वारे वाहत आहेत. किनाऱ्यावर लाटांचा मारा होत आहे. मात्र, उधाणाच्या मोठ्या भरतीमुळे तालुक्यातील सर्वच समुद्र किनाऱ्यांवर समुद्राच्या मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या आहेत. किनारी भागात वाऱ्याचा वेगही वाढलेला पाहायला मिळाला. दरम्यान, लाटांचा जोर वाढल्याने किनारपट्टीवरील नागरिकांना तसेच पर्यटकांना सतर्कतेचा प्रशासनामार्फत इशारा दिला आहे. पाऊस न पडताच लाटा असल्याने किनारी राहणारे कोळी बांधव व शेतकरी चिंतेत आहेत. जंजिरा व पदामदुर्ग किल्ल्याच्या भिंती 100 फूट उंच असून, त्याच्या वरून लाटा उडत असल्याने नेत्रदीपक दृष्ट्य निर्माण झाले आहे. लाटांचा प्रभाव वाढल्याने पर्यटकांनी सुरक्षित ठिकाणी राहून पर्यटनाचा आनंद घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. काळपासून समुद्राला उधाण आले आहे. पुढील तीन दिवस किनारपट्टी भागात वादळी वारे आणि वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पर्यटकांनी व स्थानिक नागरिकांनी समुद्रात पोहण्यास जावु नये तसेच कोळीबांधवानी मच्छीमारी करिता समुद्रात जावू नये असा सतर्कतेचा इशारा प्रशासक तथा मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी ही दिला आहे.

Exit mobile version