रोहा तालुक्यात गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

| कोलाड | प्रतिनिधी |

परतीचा पाऊस गायब झाल्यामुळे याचा मोठा फटका रोहा तालुक्यातील भातशेतीला बसला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. त्यामुळे गुरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. प्रशासनाने भातशेतीची पाहणी करून पंचनामे करावे व शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात आली आहे.

शासनाने जिल्ह्यातील फक्त श्रीवर्धन तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित केला आहे. परंतु, संपूर्ण जिल्ह्यातून परतीचा पाऊस गायब झाला आहे. यामुळे संपूर्ण भातपीक नष्ट झाला आहे. ज्या भातशेतीमध्ये पाणी साचून राहिला आहे, आशा ठिकाणी भातशेती तयार झाल्याचे दिसून येत आहे. परंतु, साठ टक्के भातशेती पाण्याअभावी सुकून गेली आहे.

दरवर्षी हस्त नक्षत्राच्या परतीच्या पावसामुळे भातशेतीला पूरक पाऊस पडून भातशेती पूर्णपणे तयार होते. परंतु हस्त, चित्रा, स्वाती, तिन्ही नक्षत्र पाऊस पडला नाही. त्यामुळे लोंबी निसावल्या नाही. तर काही लोंबी निसावल्या पण दाणा भरला नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version