पनवेलमधील पार्किंगचा प्रश्न लागणार मार्गी

। पनवेल। प्रतिनिधी ।  

पनवेल शहरातील सरस्वती विद्यामंदिर शाळेच्या जागेवरील मल्टिलेव्हल पार्किंगचा प्रस्ताव बारगळला असून, सध्या याबाबत काहीच निर्णय होणार नसल्याचे दिसून येते. शाळेचे आरक्षण बदलण्यासाठी महापालिकेच्या नव्या विकास आराखड्यात बदल करावे लागणार असल्यामुळे महापालिका प्रशासनाने सध्यातरी तात्पुरत्या शाळेचे स्वरूपात चारचाकी वाहनतळाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल शहरात चारचाकी वाहने पार्किंग करण्यासाठी महापालिकेचे एकही वाहनतळ नाही. गणेशोत्सवात शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. वाहने पार्क करण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने ही परिस्थिती उद्भवते. भेटेल त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहन लावून वाहनचालक मोकळे होतात. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली सरस्वती विद्यामंदिर शाळा इतर शाळेत स्थलांतरित करून शाळेच्या जागेवर मल्टिलेव्हल पार्किंग बनविण्याचे प्रयत्न झाले आहे. महापालिकेच्या नव्या विकास आराखड्यात आरक्षण बदलून भविष्यात मल्टिलेव्हल पार्किग बांधू असे ठरवून साधे पार्किंग विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. 

निविदा प्रक्रिया तयार करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरु असून, पुढील पंधरा दिवसांत निविदा प्रसिद्ध करुन ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत पनवेल शहरातील पहिले वहिले पार्किंग वापरता येणार आहे. सुमारे 50 चारचाकी उभ्या राहू शकतील एवढी क्षमता असलेल्या पार्किंगमध्ये स्वच्छतागृह, सुरक्षा चौकी असणार आहे. उत्सवांमुळे प्रशासनाने वाहनतळ विकसित करण्याच्या हालचाली वेगाने सरु केल्या आहेत. महापालिकेने मराठी शाळेच्या जागेवर नवी इमारत बांधून तीन शाळा तिथे स्थलांतरित केल्या आहेत. सरस्वती विद्यामंदिराची जुनी ‘झालेली इमारत पाडण्यात आली असून, या जागेवर मल्टिलेव्हल पार्किंग बांधण्याची चाचपणी करण्यात आली आली आहे. या जागेवर शाळेचे आरक्षण असल्यामुळे नवे बांधकाम करण्यात अडथळे आले. मात्र मल्टिलेव्हल पार्किंग बांधण्याचा विचार सोडून महापालिका प्रशासनाने 40 ते 50 वाहनांची व्यवस्था होईल या हेतूने वाहनतळ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळेचे आरक्षण असल्यामुळे सध्या शाळेच्या जागेवर मोठे बांधकाम करता येणे शक्य नाही. आरक्षण बदलल्यानंतर भविष्यात मल्टिलेव्हल पार्किंग बांधण्यात येईल. सध्यातरी साधे वाहनतळ विकसित करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

संजय कटेकर, शहर अभियंता
Exit mobile version