| पाली | प्रतिनिधी |
पाली शहरात चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेची दखल घेत शर्मिला बोडके यांनी पाली नगरपंचायतीला भेट देऊन नगराध्यक्ष पराग मेहता, उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर आणि मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. चिमुरडीवरील हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ नये आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी, यासाठी नगरपंचायत प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता बोडके यांनी निवेदनातून मांडली. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. पाली हे अष्टविनायक तीर्थक्षेत्र असल्याने स्थानिक नागरिकांसोबतच भाविकांचीही शहरात वर्दळ असते. अशा परिस्थितीत लहान मुले, पादचारी आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावर उपाययोजना होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर बोडके यांनी नगरपंचायत पदाधिकाऱ्यांसमोर नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी श्रीकांत ठोंबरे, जुईली ठोंबरे, किरण खंडागळे, शरद बोडके, संदेश सोनकर आणि मयूर ठोंबरे उपस्थित होते.
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर
