स्वतंत्र रुग्णालय उभारण्याची मागणी
| पनवेल | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील तळोजा, पाताळगंगा, नागोठणे, रोहा आणि उरण या औद्योगिक क्षेत्रांतील लाखो कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी पनवेल येथे स्वतंत्र व सर्व सोयींनी युक्त कर्मचारी राज्य विमा योजना रुग्णालय उभारण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कामगार युनियनचे विनायक गांधी यांनी केली आहे. यासंदर्भात राज्याचे कामगार मंत्री, कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे महासंचालक तसेच रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये हजारो कारखाने कार्यरत असून, लाखो कामगार आणि सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य बजावत आहेत. या कामगारांच्या वेतनातून दरमहा कर्मचारी राज्य विमा योजनेची वर्गणी नियमितपणे कपात केली जाते. मात्र, त्याबदल्यात मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या असल्याने कामगारांना उपचारांसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पनवेलमधील सध्याचे कर्मचारी राज्य विमा कार्यालय आणि आरोग्य केंद्र दोन मजली इमारतीत असून, तेथे उद्वाहकाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे वृद्ध, गंभीर आजारी तसेच चालण्यास असमर्थ असलेल्या रुग्णांना वरच्या मजल्यावर जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. रुग्णांच्या सोयीसाठी सर्व वैद्यकीय सुविधा तळमजल्यावर उपलब्ध करून द्याव्यात किंवा इमारतीत तातडीने उद्वाहकाची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय, अनेक वर्षांपासून हे आरोग्य केंद्र भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू असल्याने शासनाचा मोठा निधी भाड्यापोटी खर्च होत आहे. स्वतंत्र रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याची नाराजी निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. केवळ कागदोपत्री प्रक्रिया न करता प्रत्यक्ष जागा निश्चित करून रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, कामगारांच्या वेतनातून नियमितपणे विमा वर्गणी कपात होत असताना त्यांना त्यांच्या हक्काच्या आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागणे अन्यायकारक आहे. त्यामुळे राज्य शासन, कर्मचारी राज्य विमा महामंडळ आणि जिल्हा प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन पनवेलमध्ये स्वतंत्र रुग्णालय उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी विनायक गांधी यांनी निवेदनाद्वार केली आहे.






