रायगडचा जिताडा नामशेष होण्याच्या मार्गावर

कोकणातील बदलत्या वातावरणाचा परिणाम

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

मोठमोठे उद्योगपती व नेत्यांना रायगडच्या जिताडा माशाच्या चवीची भुरळ पडते. परंतु, वैशिष्ट्यपूर्ण चव असलेला रायगडचा हा जिताडा मासा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे ही खवय्ये व मत्स्य प्रेमींसाठी चिंतेची बाब असल्याचे बोलले जात आहे. एक काळ असा होता की, जिताडा खाण्यासाठी खास मुंबई पुण्यातून लोक येत असे. विशेष म्हणजे देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांना देखील रायगड मधून जिताडा जात असे.

पूर्वी समुद्रातून खाडीत आणि खाडीतून थेट भात शेतीत जीताडे प्रवेश करायचे. भात कापणीच्या काळात कोकणात हमखास घराघरात जिताड्याचा बेत ठरलेला असायचा. जिताड्याच्या चवीची ख्याती इतकी पसरलेली आहे की मुंबईत राहणारे चाकरमानी खास सुट्टी टाकून कापणीच्या हंगामात जिताडा खायला गावी येत असे. रायगडमधील जीताड्याच्या या चवीची भुरळ मोठमोठे उद्योगपती यांसह राज्यातील राजकीय नेत्यांना देखील पडते. तसेच, आजच्या निवडणुक प्रचारात जिताड्याचे कालवण महत्वाची भूमिका बजावत असे.

कोकणातील बदलत्या वातावरणाचा जिताडा माश्यांच्या प्रजननावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. खाड्यांमधील कांदळवने ही या माशाचा नैसर्गिक अधिवास आहे. रायगड जिल्ह्यातील कांदळवने रासायनिक कंपन्यांमधून समुद्रात सोडल्या जाणार्‍या रसायनमिश्रीत सांडपाण्याच्या विळख्यात सापडली आहेत. वाहून आलेला कचरा, पाण्यावर, चिखलावर तरंगणारे तेलतवंग यामुळे या माशांची अंडी घालण्याची ठिकाणे संकटात आली आहेत. याचा परिणाम म्हणजे खाडीत, शेतात आढळणारा जिताडा मासा आता केवळ खोल समुद्रात आढळून येत आहे. यामुळे कोकणातील खाद्य संस्कृतीचे वैशिष्ट्य बनलेला जिताडा मासा खाडीतून नाहीसा होत चालला आहे. खाडीतील जिताडा आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण माशांच्या प्रजाती कमी होणे ही कोकणातील अर्थकारण आणि जैव विविधतेच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. तसेच, केवळ जिताडाच नाही तर वाढते प्रदूषण, नियमबाह्य मासेमारी, यामुळे खाड्यांमधील 48 मत्स्य प्रजातींवर प्रतिकूल परिणाम झालेला आहे.

जिताडा माशाची वैशिष्ट्ये
जिताड्याचे शरीर लांबट असून डोक्यावर खोलगट भाग असतो. कल्ल्याच्या पुढील भागात एक छोटासा काटा असतो. जिताडा मासा आयुष्यातील 2 ते 3 वर्षे गोड्या पाण्यात राहतो. प्रजननक्षम मादीसोबत नर किनार्‍यालगत स्थलांतर करतात. किनार्‍यालगत कांदळवनात मादी अंडी घालते. माशाचा रंग करडा हिरवा व शरीरावर जांभळ्या रंगाच्या छटा तर पोटाचा भाग चंदेरी असतो. एका प्रजननक्षम जिताडा माशाची लांबी 45 ते 61 सेमी असते.

पूर्वी आम्ही लहान असताना शेतात कापणीच्या वेळेस शेतातील पाण्यात जिताडे मोठ्या प्रमाणावर आढळत होते. मात्र, आता जिताडे नजरेस देखील पडत नाहीत. हे मत्स्य धन घटत असून ही चिंतेची बाब आहे.

धनंजय धुमाळ,
स्थानिक, दिवलांग पेझारी

रायगड जिल्ह्यातीली अलिबाग, पेण व खारेपाट विभागात पूर्वी जिताडा मुबलक प्रमाणात मिळत होता. यामुळे त्याची किंमत देखील कमी होती. आता कृत्रिम तळ्यातील संगोपनाचा खर्च वाढल्यामुळे साहजिकच जीताड्याची किंमत खूपच वाढलेली आहे. खाडीत, शेतात मिळणारा आणि कृत्रिम तळ्यातील जिताडा यांच्या चवीत जमीन अस्मानाचा फरक आहे.

दामोदर धुमाळ,
मत्स्य व्यावसायिक, दिवलांग
Exit mobile version