खवय्याने मोजले तब्बल 24 हजार रुपये
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील खाडीत लावण्यात आलेल्या वाणा प्रकारच्या मासेमारीत कोल्ही कोपर येथील मत्स्यप्रेमींना जिताडा मासा सापडला. कोपर गावातील सत्यवान पाटील, चंद्रकांत म्हात्रे, पारगाव गावचे अंकुश गायकवाड हे पिढ्यान पिढ्या मासेमारीचा धंदा करीत असून, या मासेमारांना तब्बल 20 किलो वजनाचा जिताडा मासा मिळाला. पनवेल तालुक्यातील पारगाव गावातील एका खवय्याने तब्बल 24 हजार रुपये मोजून हा मासा खरेदी केल्याची माहिती सत्यवान पाटील यांनी दिली.
रायगड जिल्ह्यासह पनवेल तालुक्यात जिताडा मासा म्हणजे अगदी पापलेट, हलव्याला देखील बाजूला ठेवणारा मासा म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर जिताडा माशाला मासळीचा राजा’ म्हणून ओळखले जाते. खाडी किनारी सुमारे एक ते दोन किमीच्या परिघात काठ्या उभारून त्याला जाळे बांधले होते. आणि पूर्ण भरती झाल्यावर जाळे खाडीच्या बाजूने काठीच्या उंचीवर उभे केले होते. त्यामुळे जाळे आणि किनारा यांच्यामध्ये अडकलेली मासळी या वाणा प्रकारच्या मासे पकडणीत मिळत असते. त्याचबरोबर पूर्वीच्या काळी तर पैशाने जी कामे होत नव्हती, ती या जिताडा माशाने अगदी जलद होत असायची.







