‘द काश्मिर फाइल्स’ गूगलवर ट्रेंड

नुकताच प्रदर्शित झालेला आणि सर्वांनाच भावत असलेला ‘द काश्मिर फाइल्स’ हा चित्रपट चांगलाच धुमाकूळ घालत आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटातून त्यांना दिसलेली काश्मीरच्या इतिहासातील एका काळ्या अध्यायाविषयीची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडलेली आहे.

१९९० साली काश्मीरमध्ये घडलेल्या एका क्रूर घटनेची पार्श्वभूमी या चित्रपटात दाखवली आहे. एक्सोडस आणि जेनोसाइड यावरून भिन्न मतं आजही बघायला मिळतात. त्या काळी मोठ्या संख्येने काश्मिरी पंडित त्यांची घरं सोडून निघून गेले (एक्सोडस) असं म्हटलं जातं. पण खरं तर ते निघून गेले नाहीत, त्यांचा क्रूर वंशविच्छेद (जेनोसाइड) करण्यात आला असा दावा हा चित्रपट करतो.

सिनेमात ‘स्टार’ नसले तरी अनुभवी कलाकारांची मोठी फळी आहे. त्यामुळे चित्रपटातील अभिनयाची बाजू उजवी ठरते. अनुपम खेर यांनी स्वत:चं घर परत मिळवण्यासाठी, स्वत:च्या हक्कांसाठी लढणाऱ्या वयस्कर पुरुषाची भूमिका चोख निभावली आहे. मिथुन चक्रवर्ती, पुनित इसार, प्रकाश बेलावडी, अतुल श्रीवास्तव, मृणाल कुलकर्णी, पल्लवी जोशी यांच्या कामात त्यांच्या इतक्या वर्षांचा अनुभव दिसतो. विशेष कौतुक करावं लागेल ते चिन्मय मांडलेकरचं. त्यानं साकारलेल्या फारुक अहमद दर या व्यक्तिरेखेचा राग येऊ लागतो. यातच त्याचं यश म्हणावं लागेल. दर्शन कुमारला सध्याच्या फळीतील उत्तम कलाकार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तत्कालीन काश्मिरी पंडितांचं झालेलं शोषण, त्यावेळचं दाहक वास्तव, भीषणता, परिणाम दाखवण्याच्या ज्या हेतूनं केलेल्या या चित्रपटाबद्दल सगळीकडेच चर्चा रंगली आहे.

Exit mobile version